---Advertisement---

आराम हराम है! मायदेशी परतताच श्रीलंकेचे क्रिकेटपटू काही तासांत पुन्हा मैदानावर

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 12:57 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाने सरासरी कामगिरी केली. पहिल्या पात्रता फेरीत श्रीलंकेने सर्व सामने जिंकून सुपर १२ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुपर १२ मध्ये वेस्ट इंडिज आणि बांगलादेशसारख्या संघांना पराभूत करून त्यांनी चांगला खेळ दाखवला. श्रीलंका संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे, सध्या संघाचे भविष्य युवा खेळाडूंवर अवलंबून आहे. विश्वचषक संपल्यानंतरही संघातील युवा खेळाडूंनी विश्रांती घेतलेली नाही आणि आपल्या स्थानिक संघाकडून खेळण्यासाठी थेट मैदानावर उतरले आहेत.

श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका, चरिथ असलंका आणि अविष्का फर्नांडो आपल्या स्थानिक संघासाठी सामना खेळण्यासाठी पोहोचले. मैदानात उतरण्याआधी काही तासांपूर्वी ते दुबईहून आपल्या देशात पोहोचले होते. खेळासाठी अशी बांधिलकी पाहून या खेळाडूंचे क्रिकेटवरील प्रेम दिसून येते. श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सध्याचा प्रशिक्षक थिलिना कदंबीने त्याच्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. या खेळाडूंनी क्रिकेटवरील प्रेम कसे दाखवले आहे, हे त्यांनी सांगितले.

थिलिना कदंबीने एक ट्विट करत फोटो पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नुकतेच या खेळाडूंनी राष्ट्रासाठी आपले कर्तव्य बजावले आहे. हे खेळाडू रात्री १.४५ वाजता श्रीलंकेत दाखल झाले. त्यानंतर ४ वाजता सर्वजण आपापल्या घरी गेले आणि ८ वाजता सिंहल्स स्पोर्ट्स क्लब आणि तमिळ युनियन क्रिकेट अँड ऍथलेटिक क्लब यांच्यातील सामना खेळण्यासाठी पोहोचले. शनाका, चरिथ आणि अविष्का फर्नांडो तुमची क्रिकेटसाठी बांधिलकी पाहून आनंद झाला, आणि मला मनापासून आशा आहे की आपल्या देशाचे भविष्य चांगले आहे.’

या तिन्ही खेळाडूंनी टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. विशेषत: चरिथ असलंकाच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने ६ डावात ४६.२० च्या सरासरीने २३१ धावा केल्या होत्या आणि तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शनाकाने उत्कृष्टपणे कर्णधारपद सांभाळले, तर अविष्का फर्नांडोनेही संघाला गरज असतांना संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---