बुधवारी (१५ सप्टेंबर) कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियस या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सेंट किट्स संघाला चांगली सुरुवात मिळाली नसताना देखील शेवटच्या चेंडूवर सेंट लुसिया किंग्ज संघाला ३ गडी राखून पराभूत करत, कॅरेबियन प्रीमियर लीग चषकावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात सेंट लुसिया किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत सेंट लुसिया किंग्ज संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या संघाकडून कॉर्नवॉल आणि रोस्टन चेसने प्रत्येकी ४३ -४३ धावांची खेळी केली. तर शेवटी किमो पॉलने चौफेर फटकेबाजी करत ३९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ गगनचुंबी षटकार मारले. या खेळीच्या जोरावर सेंट लुसिया किंग्ज संघाला २० षटकअखेर ७ बाद १५९ धावा करण्यात यश आले होते.
सेंट किट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकार १६० धावांची आवश्यकता होती. परंतु या संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. एविन लुईस ६ तर ख्रिस गेल भोपळाही न फोडता माघारी परतला होता. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी जोशुआ डि सिल्वा आणि रुदरर्फॉर्ड यांनी मिळून ४५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या विजयात डॉमिनिक ड्रेक्सने मोलाची भूमिका बजावली. त्याने शेवटपर्यंत टिकून सेंट किट्स संघाला विजय मिळवून दिला. डॉमिनिक ड्रेक्सने २४ चेंडूंमध्ये २०० च्या स्ट्राइक रेटने नाबाद ४८ धावांची तूफानी खेळी केली.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना
या सामन्यात सेंट किट्स संघाला अंतिम षटकात विजय मिळवण्यासाठी ६ चेंडूंमध्ये ९ धावांची आवश्यकता होती. षटकातील पहिल्याच चेंडूवर ड्रेक्सने १ धावा घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील फलंदाजाला १ धाव पूर्ण करण्यात यश आले होते. षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने पुनरागमन करत निर्धाव चेंडू टाकला. त्यानंतर षटकातील चौथ्या चेंडूवर ड्रेक्सने शॉट खेळताच धावून २ धावा पूर्ण केल्या. तर अखेरच्या २ चेंडूंमध्ये ५ धावांची आवश्यकता असताना, ड्रेक्सने ५ व्या चेंडूवर चौकार मारला आणि धावफलक बरोबरीत आणले.
त्यानंतर शेवटच्या चेंडूवर किट्स एंड नेविस संघाला विजय मिळवण्यासाठी एक धावेची आवश्यकता होती. त्यावेळी ड्रेक्सने १ धाव करून ड्वेन ब्रावोच्या नेतृत्त्वाखालील किट्स एंड नेविस संघाला विजेतेपद मिळवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का?
आपल्या चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकल्याने चिडला पाकिस्तानी गोलंदाज, तिखट खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल





