आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्यख चर्चेने जोर धरला आहे. सर्व संघांनी आपले महत्त्वपूर्ण क्रिकेटपटू कायम राखल्यानंतर सर्वजण लिलावाची वाट पाहत आहेत. १८ तारखेला हा लिलाव चेन्नई येथे पार पडेल. तत्पूर्वी, आज लिलावासाठी नोंदणी केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर झाली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचे नाव नाही.
स्टार्कने नाही नोंदवले नाव
बीसीसीआयने जाहीर केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव नसल्याने सर्वांना धक्का बसला. स्टार्क लिलावात सहभागी झाल्यास त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता होती. मात्र, स्टार्कने चाहते व संघमालकांना आश्चर्यचकित केले. अनेक क्रिकेट जाणकार तसेच माजी क्रिकेटपटूंनी स्टार्क या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल असा कयास लावला होता. परंतु, स्टार्कचे नाव या यादीत नसल्याने सर्वांचा हिरमोड झाला.
यापूर्वी आयपीएलमध्ये खेळला आहे स्टार्क
सध्याच्या पिढीतील दिग्गज गोलंदाज असलेला स्टार्क यापूर्वी दोन हंगामात आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. २०१४ व २०१५ या हंगामात त्याने विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे केले होते. तसेच, २०१८ आयपीएल हंगामावेळी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेतलेले. मात्र, दुखापतीमुळे तो संघासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. स्टार्कच्या नावे ३४ आयपीएल बळी जमा आहेत.
१,०९७ क्रिकेटपटूंनी केली नावनोंदणी
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तब्बल १,०९७ खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ८१४ भारतीय व २८३ विदेशी खेळाडूंची नावे आहेत. या यादीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले २१ क्रिकेटपटू आहेत. तसेच १८६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली विदेशी क्रिकेटपटू आहेत. आयसीसीचे सहयोगी देश असलेल्या देशांच्या २७ क्रिकेटपटूने देखील यात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित क्रिकेटपटू हे कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग
आयपीएल २०२१ साठी केली इतक्या क्रिकेटपटूंनी नावनोंदणी
सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल