अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (४ मार्च) कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.
या कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथा सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर भारत किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक जण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करेल. जर या सामन्यात भारताने विजय मिळवला किंवा हा सामना अनिर्णित राहिला तर भारताला अंतिम सामन्यात प्रवेश करता येणार आहे. पण जर हा सामना भारत पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
या बरोबरच काही खेळाडूंसाठीही हा सामना खास ठरु शकतो, त्यांना काही खास विक्रम या सामन्यात करण्याची संधी आहे. या विक्रमांबद्दल जाणून घेऊ.
१. चौथ्या कसोटीत जर विराटने शतक केले तर तो रिकी पाँटिंगला कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करण्याच्या यादीत मागे टाकेल. सध्या विराट आणि पाँटिंगच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी ४१ शतकं आहेत. याबरोबरच खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाँटिंगची बरोबरी करु शकतो. सध्या खेळाडू म्हणून पाँटिंगच्या नावावर ७१ तर विराटच्या नावावर ७० शतकं आहेत. तर अव्वल क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकं आहेत.
२. अक्षर पटेलने या मालिकेत आत्तापर्यंत २ सामने खेळले असून १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत पहिल्या तीन गोलंदाजांच्या यादीत येण्याची संधी आहे. सध्या या यादीत त्याच्यापुढे दिलीप दोशी(२७), शिवलाल यादव (२४), आर अश्विन (२२) आणि वेंकटराघवन (२१) हे गोलंदाज पुढे आहेत.
३. जेम्स अँडरसनने जर या सामन्यात ९ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अनिल कुंबळेला मागे टाकेल. सध्या अँडरसनच्या नावावर ६११ विकेट्स घेतल्या आहेत. तर कुंबळेच्या नावावर ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या यादीत ८०० विकेट्ससह मुथय्या मुरलीधरन अव्वल क्रमांकावर आणि ७०८ विकेट्स शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे.
४. जर हा सामना इंग्लंडने जिंकला तर जो रुट इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार ठरेल. सध्या इंग्लंडचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या यादीत प्रत्येकी २६ विजयांसह मायकल वॉन आणि जो रुट संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत.
५. जर या सामन्यात उमेश यादवला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आणि त्याला ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो भारतात १०० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करेल, तर एकूण १५० कसोटी विकेट्स पूर्ण करेल.
६. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ८ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो ५० कसोटी विकेट्स पूर्ण करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’
‘मला श्रीसंत नाही, ब्रेट ली बनायचंय’, भारतीय खेळाडूची ७ वर्षांपूर्वीची कमेंट व्हायरल