बुधवारपासून (दि. 7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर रंगणार आहे. मात्र, यापूर्वीच पाच दिवसीय सामन्यांच्या भविष्याविषयी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने सोमवारी (दि. 5 जून) चिंता व्यक्त केली. जगभरातील वाढत्या फ्रँचायझी क्रिकेटने आंतरराष्ट्रीय सामन्यांवर दबाव टाकला आहे. छोट्या देशांना भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या देशांविरुद्ध पुरेसे कसोटी क्रिकेट खेळण्याची संधीच मिळत नाहीये.
काय म्हणाला स्मिथ?
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने कसोटीच्या सर्वात मोठ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वी पाच दिवसीय क्रिकेट प्रकाराच्या भविष्याविषयी चर्चा केली. त्याने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी म्हटले की, “होय, मी थोडा चिंतीत आहे. मात्र, आशा करतो की, कसोटी क्रिकेट सुरू राहील. मला वाटते की, हे सध्या चांगल्या स्थितीत आहे. नुकतेच आपण काही शानदार सामने पाहिले आहे, त्यामुळे मला वाटते की, एक पारंपारिक रूपात कसोटी क्रिकेट आवडीचे आहे. मी आशा करतो की, हे सर्व क्रिकेट बोर्डांच्या अव्वलस्थानी राहील आणि आगामी काळातही पुढे जात राहील.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याविषयी पुढे बोलताना स्मिथ म्हणाला की, त्याला आशा आहे की, भारतीय गोलंदाजी आक्रमण चांगले आव्हान देईल. काही काळापूर्वी भारतात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाची तयारी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या भोवती फिरत होती, पण आता त्यांना मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांसारख्या वेगवान गोलंदाजांचाही सामना करावा लागेल. स्मिथ म्हणाला की, “मला वाटते की, त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांचे चांगले मिश्रण आहे. शमी आणि सिराज हे भारताचे संभावित मुख्य वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांच्याकडे शानदार कौशल्य आहे. मला वाटते की, ड्यूक चेंडू त्यांच्यासाठी अनुकूल असेल.”
पुढे बोलताना स्मिथ म्हणाला की, “नक्कीच त्यांचे फिरकीपटूही आव्हान देतील, जे कोणत्याही परिस्थितीत चांगली गोलंदाजी करतात. त्यामुळे मला वाटते की, त्यांचे आक्रमण चांगले आहे.” ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा द ओव्हल मैदानात जूनमध्ये कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर 1880 पासून कसोटी सामने खेळले जात आहेत.
सोमवारी खेळपट्टीवर गवत दिसत होते, पण आशा आहे की, कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी ते गवत कापले जाईल. स्मिथ म्हणाला की, “मी आतापर्यंत खेळपट्टी पाहिली नाहीये, त्यामुळे मी याबाबत जास्त काही बोलू शकत नाही. मात्र, तुम्ही बरोबर म्हणालात, उन्हाळ्यात सामान्यत: हे थोडे सुकलेले असते. विशेषत: खेळ पुढे नेण्यासाठी फिरकी गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते.”
ऑस्ट्रेलियाला धक्का
ऑस्ट्रेलिया संघाने सोमवारी दीर्घ सराव सत्रात भाग घेतला आणि पुरेसे संकेत मिळाले की, वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याच्या जागी स्कॉट बोलँड याला खेळण्याची संधी मिळेल. अष्टपैलू कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स याच्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाजीत चौथा पर्याय असेल. (steve smith on future of test cricket ahead of wtc final 2023|)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणे बर्थडे स्पेशल: अशी आहे ‘कूल’ अज्जूची ‘ऑर्कुटवाली’ लव्हस्टोरी, वाचायलाच हवी
ऍशेससाठी इंग्लंडचा मास्टरस्ट्रोक! थेट दिग्गज निवृत्त खेळाडूलाच देणार संधी