---Advertisement---

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघातील ‘करो या मरो’च्या सामन्यात ‘या’ खेळाडूचे होणार पुनरागमन

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 11:54 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी मंगळवारी सांगितले की, स्टीव्ह स्मिथ नेट प्रॅक्टिसमध्ये परत येणार आहे आणि तो इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात खेळेल.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्मिथला वनडे मालिकेआधी सराव दरम्यान कोचिंग स्टाफचा एक थ्रो डोक्यावर लागला होता. त्यामुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण तिसऱ्या सामन्याच्या आदल्या दिवशी त्याला पुरेसा सराव मिळाल्यास स्मिथ नक्कीच खेळण्यास तयार होईल, असे लॅंगर यांनी सांगितले.

तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी खेळला जाणार आहे. लॅंगर म्हणाले की, “आम्ही कनक्शनच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत आहोत. तो योग्य दिशेने वाटचाल करीत असून अपेक्षा आहे की तो तिसऱ्या सामन्यात खेळेल.”

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन वनडे सामन्यांची मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला होता पण दुसर्‍या सामन्यात २३१ धावांचा पाठलाग करताना त्यांना केवळ २०७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाची मधली फळी गडगडली त्यामुळे त्यांना जिंकत आलेला सामना गमावावा लागला.

स्टीव्ह स्मिथच्या आगमनामुळे संघाच्या फलंदाजीला बळकटी मिळेल ज्याची त्यांना खूप आवश्यकता आहे.

याअगोदर दोन्ही देशांमध्ये ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. त्यामध्ये इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली. तर ऑस्ट्रेलियाला फक्त अखेरचा सामना जिंकता आला.

दोन्ही संघांचे बरेचसे खेळाडू आता वनडे मालिकेनंतर युएईला आयपीएल खेळण्यासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, इयॉन मॉर्गन, अ‍ॅडम झम्पा यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---