भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सहज मालिका जिंकेल अशी सर्वांनी शक्यता वर्तवली होती. मात्र कठीण परिस्थितीतही भारतीय संघाने पुनरागमन करत ऐतिहासिक विजय मिळवला.
भारताच्या या विजयाबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून आनंद व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर टीकेची झोड उठत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मात्र या मानहानीकारक पराभवाला मागे टाकत नवी सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने नुकत्याच वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असलेला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा अॅलन बॉर्डर पुरस्कार स्टीव स्मिथला जाहीर केला आहे. स्मिथ सोबत या पुरस्काराच्या शर्यतीत वेगवान गोलंदाज पॅट कमिंस व मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार अॅरोन फिंच देखील होते. मात्र स्मिथने यात बाजी मारली. स्मिथला एकूण 126 मते मिळाली, तर कमिंसला 114 व फिंचला 97 मते मिळाली.
मानाचा अॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाल्यानंतर स्मिथने आनंदा सोबतच थोडे आश्चर्य देखील व्यक्त केले. स्मिथ म्हणाला ,”मी थोडा आश्चर्यचकित झालो होतो. मला नाही वाटत मी एकदम शानदार कामगिरी केली. मला वाटलं होत की कमिंस अथवा मार्नस लबुशानेला हा पुरस्कार मिळेल. निश्चितच पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. यामागे अथक परिश्रम लपलेले आहे.”
स्मिथने तिसऱ्यांदा अॅलन बॉर्डर पुरस्कार मिळवलेला आहे. स्मिथशिवाय केवळ माइकल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांना हा पुरस्कार प्रत्येकी 4 वेळा मिळालेला आहे. तसेच स्मिथला मागील वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळाडू देखील घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना आशा असेल की, आगामी काळात स्मिथ आणखीन उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून देईल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान