क्रिकेटपटू बनू पाहणाऱ्या सर्वांचेच एक स्वप्न असते, ते म्हणजे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळण्याचं. त्याच लॉर्ड्सवर कसोटी पदार्पणाचं भाग्य लाभणं म्हणजे केवळ सुदैवच. पण असं भाग्य लाभलं 1996ला भारताच्या राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीला. त्यावेळी गांगुलीने पदार्पणातच आणि तेही लॉर्ड्सवर शतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी त्या सामन्यात व्यंकटेश प्रसादने घेतलेल्या 7 विकेट्स. पण या सर्वांमध्ये द्रविडची 95 धावांची खेळी कुठेतरी झाकोळली गेली. तसा द्रविड हा कायमच गांगुली, सचिन, कुंबळे यांसारख्या दिग्गजांच्या छायेत राहिला. पण तरीही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला. अशाच या सभ्य खेळाडू म्हणून नाव कमावणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid)याची ही गोष्ट .
राहुलचा जन्म 11 जानेवारी 1973ला मध्यप्रदेशमधील इंदोर येथे एका मध्यमवर्गीय पण उच्चशिक्षित कुटुंबात झाला. राहुलची आई पुष्पा या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोफेसर होत्या. तर वडील शरद द्रविड जाम बनवणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. यामागे एक गमतीशीर किस्सा आहे. शरद द्रविड जाम आणि ज्यूस बनवणाऱ्या किसान प्रोडक्टच्या कंपनीमध्ये कामाला असल्याने राहुलला रणजी ट्रॉफी खेळताना ‘जॅमी’ हे टोपन नाव पडले होते. पुढे जॅमी हे टोपन नाव राहुलला चिटकले ते कायमचेच. विशेष म्हणजे एकदा राहुलने किसान जॅमची जाहिरातीतही काम केले होते. या जाहीरातीनंतर जवागल श्रीनाथनेही राहुलला जॅमी म्हणायला सुरुवात केली होती.
राहुलची आई प्रोफेसर असल्याने राहुलला शिक्षणाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. खेळाबरोबरच शिक्षणही महत्त्वाचे हे विचार त्याच्या मनावर आधीपासूनच बिंबवण्यात आले. त्याचमुळे त्याने क्रिकेट खेळत असतानाही कधी त्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. राहुलने जेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले त्यावेळीही तो महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होता. पुढे द्रविडने त्याचे एमबीए पूर्ण केले.
राहुल 11-12 वर्षांचा असेल तेव्हा कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या कॅम्पमध्ये त्याच्या सेंट जोसेफ शाळेकडून खेळताना त्याला केकी तारापोरे यांनी पाहिलं आणि त्याच्यातील गुणवत्ता हेरली. त्यावेळी द्रविडने शतक केले होते आणि तो यष्टीरक्षणही करत होता. पुढे जाऊन राहुलने कर्नाटकच्या 15, 17 आणि 19 अशा वयोगटाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. राहुल वयोगटातील क्रिकेटमध्ये चमकू लागला. ते पाहुन जेमतेम 18 वर्षाचा असताना त्याला रणजी खेळण्याची संधी मिळाली. आलेली संधी गमावयची नाही हे पहिल्यापासूनच ठरवलेल्या द्रविडने 1991 ला पहिल्याच रणजी सामन्यात पुण्यात महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना 82 धावांची खेळी केली. त्यांनंतर त्याने बंगालविरुद्ध शतक झळकावलं आणि नंतर आणखी ३ शतके करत त्याचे नाणे खणखणीत वाजवले. 1991-92 चा रणजी मोसमही राहुल खेळला. फक्त खेळला नाही तर त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या मोसमात त्याने 5 सामने खेळले. या 5 सामन्यात त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतकासह 63.33 च्या सरासरीने 380 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला दुलिप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली.
त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी पाहता निवड समितीने राहुलला भारत अ संघात इंग्लंड अ संघाविरुद्ध खेळण्यासाठी संधी दिली. त्यावेळी द्रविडबरोबर या संघात गांगुली, साईराज बहुतुले, अमोल मुजुमदार, सलील अंकोला, पारस म्हांब्रे असे खेळाडू देखील होते. या मालिकेनंतर अखेर काही दिवसातच राहुलचे नाव भारताच्या वरिष्ठ संघात झळकले. 1996 च्या विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सिंगापूर येथे झालेल्या सिंगर कपमध्ये श्रीलंका विरुद्धच्या वनडे सामन्यातून द्रविडचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. पण द्रविड खास काही करु शकला नाही. पहिले काही वनडे सामने द्रविडसाठी विसरुन जावे असेच राहिले.
पण असे असतानाही द्रविडची इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आणि द्रविडचे लॉर्ड्सवर पदार्पण झाले. हे पदार्पण करण्याआधीचा एक खास किस्सा आहे तो असा की व्यंकटेश प्रसाद आणि द्रविडमध्ये एक पैज लागली होती. प्रसादही त्यावेळी भारतीय संघात नवीनच होता. लॉर्ड्सच्या मैदानाच एक ऑनर बोर्ड आहे. यावर शतक केलेल्या किंवा एका डावात 5 विकेट घेणाऱ्या खेळाडूचे नाव कोरले जाते. त्या ऑनर बोर्डवर नाव कोरण्याची पैज प्रसाद आणि द्रविड यांची लागली. त्यावेळी प्रसादने पहिल्या डावात 5 विकेट घेत त्याची पैज पूर्ण केली. मात्र राहुलला यासाठी केवळ 5 धावा कमी पडल्या. तो 95 धावांवर बाद झाला. पण त्याची ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली. कारण तो फलंदाजीला आला तेव्हा सचिन, अझरुद्दीन, अजय जडेजा असे दिग्गज खेळाडू बाद झाले होते आणि फलंदाजी करत होता तो गांगुली. गांगुलीचाही हा पहिलाच सामना. पण या दोघांनी भारताला सावरले. पुढे गांगुली 131 धावा करुन बाद झाला, पण द्रविडने त्याचा संयम राखत तळातल्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. हा सामना अनिर्णित राहिला, पण या सामन्यातून भारताला द्रविड, गांगुली, प्रसाद हे हिरे सापडले.
यानंतर मात्र द्रविडने मागे वळुन पाहिले नाही. सुरुवातील वनडेमध्ये अपयशी ठरल्याने केवळ कसोटीचा फलंदाज असा शिक्का लागलेल्या द्रविडने वनडेतही धावांचा पाऊस पाडला. आज त्याच्या नावावर वनडेतही 10 हजारपेक्षा अधिक धावा आहेत, हे महत्त्वाचे. द्रविडने पुढे जाऊन अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. पण त्याला ओळख मिळाली ती 1997 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात. या दौऱ्यात भारताची फलंदाजी अपयशी ठरत असताना द्रविड उभा राहिला. या दौऱ्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताने सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला दक्षिण आफ्रिका संघ आता तिसरा कसोटी सामना जिंकून भारताला व्हाईटवॉश देणार असेच वाटत होते. पण त्यावेळी राहुलने ऍलेन डोनल्ड, शॉन पोलाक, लान्स क्लुसेनर अशा दिग्गज गोलंदाजी आक्रमणाचा सामना करताना तिसऱ्या सामन्यात पहिल्याच डावात 148 धावांची खेळी केली. त्यावेळीही गांगुलीनेच त्याला 75 धावा करत भक्कम साथ दिली. त्या सामन्यात पुढच्या डावातही द्रविडने 146 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताला सामना जिंकण्याची संधी चालून आली होती. पण हा सामना अनिर्णित राहिला. असे असले तरी भारताची भिंत त्याला का म्हटले जाते याची झलक त्याने पहिल्यांदा त्यावेळी दिली. नंतर त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या. यात 2004 पाकिस्तानविरुद्धची मालिका असो किंवा त्याने 2001 ला कोलकाता येथे इडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतर लक्ष्मणबरोबर दिवसभर खेळून केलेली भागीदारी असो.
या सगळ्यामध्ये द्रविडने कधीही आपला संयम सोडला नाही. या काळात द्रविडला जे-जे काम सांगण्यात आले ते-ते त्याने जबाबदारीने केले. त्याला कधी यष्टीरक्षण करण्यासाठी सांगितले गेले, तर कधी सलामीला फलंदाजीला उतरवले. पण संघासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या द्रविडने कधीही ‘नाही’ म्हटले नाही. प्रामुख्याने यष्टीरक्षक नसणाऱ्या द्रविडने तब्बल 70 पेक्षाही अधिक वनडे सामन्यात यष्टीरक्षण केले. हेच कमी की काय म्हणून द्रविडवर कर्णधारपदाचीही जबाबदारी टाकण्यात आली होती. 2005 ते 2007 या कालावधीत त्याने भारताचे नेतृत्व सांभाळले. तेही गांगुली-चॅपेल यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर. त्यावेळी झालेला हा वाद ज्यांना माहित असेल त्यांना द्रविडला मिळालेल्या कर्णधारपदाच्या काटेरी मुकुटाचे महत्त्व समजेल. त्यावेळी त्याने 25 कसोटी आणि 79 वनडेत भारताचे नेतृत्व केले. यात 8 कसोटी सामने आणि 42 वनडे सामने भारताने जिंकले. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली सलग 15 वनडे सामने धावांचा पाठलाग करताना जिंकण्याचा विक्रमही भारताने केला. पण द्रविडच्या नेतृत्वाला ग्रहण लागले 2007 च्या विश्वचषकात. त्या विश्वचषकात भारताने सपाटून मार खाल्ला आणि साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. अखेर त्याने कर्णधारपद सोडले.
असे असले तरी द्रविडच्या काळात भारताने अनेक मोठे विक्रम केले. द्रविडच्याच नेतृत्वाखाली भारताने 1971नंतर पहिल्यांदा वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली. 2006ला जोहान्सबर्गला कसोटी सामना जिंकून भारताचा दक्षिण आफ्रिकेतील पहिला विजयही द्रविडच्याच नेतृत्वाखाली आला. इंग्लंडमध्ये 21 वर्षांनंतर 2007ला भारताला कसोटी मालिका जिंकण्यात द्रविडच्याच नेतृत्वाखाली यश मिळाले.
2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारताचा संपूर्ण संघ संघर्ष करत असताना द्रविडची फलंदाजी ही भारतीयांसाठी एकमेव आनंद देणारी गोष्ट होती. त्या दौऱ्यात 4-0 असा सपाटून कसोटीत मार खाल्लेल्या भारताकडून द्रविडने 8 डावात 76.83 च्या सरासरीने 3 शतकांसह 461 धावा केल्या. त्याच दौऱ्यात द्रविडने सप्टेंबरमध्ये वनडे क्रिकटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने कार्डीफ येथे त्याचा शेवटचा वनडे सामना खेळताना 69 धावांची खेळी केली होती. पुढे 4 महिन्यांनंतर द्रविड ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला.
नेहमीच लढावू वृत्तीने खेळणाऱ्या, संघ संकटात सापडल्यानंतर स्वत: जबाबदारी घेणाऱ्या समोरच्या गोलंदाजाला बोलून नाही पण त्याच्या बॅटने वेगाने आलेला चेंडू तसाच खेळपट्टीवर आदळवून डिवचणारा द्रविड फक्त नावापुरता क्रिकेटचा जंटलमन नव्हता. तो खेळाडूंना मदत करण्यासाठीही कायम पुढे असायचा आणि तेही केवळ भारताच्याच नाही तर कोणत्याही संघाच्या. आयपीएलच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून द्रविड आणि केविन पिटरसन एकत्र खेळायचे त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. एकदा पिटरसनला फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी अडचण येत होती. त्यावेळी द्रविडने त्याला इमेल करुन फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचे धडे दिले होते. त्याआधी पाकिस्तानविरुद्ध एका मालिकेत पराभूत झाल्यानंतरही त्यावेळी युवा असणाऱ्या युनुस खानने द्रविडला फलंदाजीबद्दल काही सल्ले विचारले होते. त्यावेळीही द्रविडने पुढे-मागे न पहाता युनुसशी त्याच्या रुममध्ये जाऊन राहुलने चर्चा केली होती. याबद्दल युनुस आजही म्हणतो द्रविडबरोबरच्या त्या भेटीने माझे आयुष्य बदलले.
द्रविडचा प्रामाणिकपणा इथेच संपत नाही. तो अनेकदा त्याच्या मुलांच्या शाळेत सामान्य पालकांप्रमाणे हजर रहातो. तो त्यावेळी क्रिकेटर द्रविड नसतो. तर त्याच्या मुलांचा बाबा असतो. बंगळुरुमध्ये सामना असताना तो कोणत्याही व्हिआयपी बॉक्समध्ये नाही तर अन्य प्रेक्षकांप्रमाणे स्टँडमध्ये बसलेला दिसतो. त्याला एकदा मानद पीएचडीची पदवीही देऊ करण्यात आली होती. परंतू तीही त्याने प्रामाणिकपणे नाकारली. का तर तो म्हणतो ही पदवी मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. आणि मी माझ्या आई आणि पत्नीला अशी मेहनत घेताना पाहिले आहे. द्रविडची पत्नी विजेताही डॉक्टर आहे. तिने एका मुलाखतीत द्रविडबद्दल एक खास किस्सा सांगितला होता. द्रविड हा त्याचा सामना खेळण्याआधी त्याचा थोडा वेळ घेतो. या वेळेत तो कोणाशीच बोलत नाही. तो वेळ केवळ त्याचाच असतो. परदेशी दौऱ्यात तो जरी त्याच्या कुटुंबासमवेत असला तरी तो सामन्याआधी काहीवेळ दुसऱ्या खोलीत एकटा बसतो.
द्रविडची फलंदाजी पाहिली की एका ध्यानस्थ योगी सारखा तो एखाद्याला भासू शकतो. कितीही वेगात आलेला चेंडू तो तितक्याच लिलया खेळपट्टीवर आदळवतो. त्याची कितीही वेळ खेळपट्टीवर उभी राहण्याची तयारी असते. याबद्दल तो म्हणतो, जर तूम्ही खेळपट्टीवर टिकून राहिला तर धावा होतातच आणि हेच द्रविड त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत करत आला आहे.
द्रविडबद्दल आणखी एक गमतीशीर किस्सा म्हणजे तो त्याच्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असताना अनेकदा त्याचे चाहाते त्याला भेटायचे यावेळी त्याचे आई-वडील त्याला त्यांच्याशी भेटत जा असे सांगायचे. पण एकदा एक चाहती थेट त्याच्या घरी आली होती आणि त्याच्याशी लग्न करायचे म्हणून हटून बसली होती. अशा परिस्थितीत त्याच्या आई-वडीलांनीही तिला खूप समजावले होते अखेर पोलिसांना बोलवावे लागले. या घटनेनंतर मात्र त्याच्या आई-वडीलांनी याबद्दल कधीही त्याला काही सांगितले नाही.
असे काही चाहते सोडले तर अनेकदा द्रविड त्याच्या प्रामाणिक चाहत्यांना भेटला आहे. एकदा त्याच्या एक कर्करोग असणाऱ्या चाहत्याला त्याला भेटायचे होते. परंतू द्रविडला ते शक्य नसल्याने त्याने स्काईपवरुन त्याच्याशी संवाद साधला होता. इतकचं नाही तर त्याने त्यावेळी त्या तो वैयक्तिकरित्या भेटायला येऊ शकला नाही म्हणून माफीही मागितली होती.
90 च्या आणि 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात सर्वांना आपल्या खेळीने भुरळ पाडणाऱ्या गांगुली, सचिन, द्रविड, कुंबळे हे पुढे जाऊन निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये आपले योगदान देतील असे सर्वांना वाटले होते. यात सचिन सोडले तर गांगुली आणि द्रविडने या अपेक्षा खऱ्या केल्या. फक्त द्रविडने त्याचा मार्ग वेगळा निवडला. त्याने तयार क्रिकेटपटूंना घडवण्यापेक्षा युवा क्रिकेटपटूंना तयार करण्यामध्ये रस दाखवला. आज भारताकडून खेळताना दिसणाऱ्या पृथ्वी शॉ, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या युवा क्रिकेटपटूंना पुढे आणण्यामागे द्रविडचाही मोठा हात आहे.
द्रविडने 19 वर्षांखालील आणि भारत अ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळताना एक नवीन पिढी घडवली. यावेळी त्याने एक नियमही केला एकदा 19 वर्षांखालील विश्वचषक खेळल्यानंतर त्या खेळाडूने पुन्हा 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये रमू नये. त्या क्रिकेटपटूने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याकडे भर द्यावा. ज्यामुळे त्याच्यात सुधारणा होईल. द्रविडला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विश्वचषक जिंकण्यात यश आले नाही. पण म्हणतात ना नशीबात असेल तर ते मिळतेच. त्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग असण्याचे भाग्य मिळाले ते 2018 मध्ये जेव्हा त्याच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. द्रविड एवढ्यावर थांबला नाही. तर त्याने बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख बनत तिथे युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचे काम केले आणि आता तर तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.
हेही वाचा
अर्रर! टीम इंडियाला नडायला येणाऱ्या संघाची मदत करणार एक भारतीयच, सांगणार सगळी गुपीतं
दिलदार सॅमसन! रणजी ट्रॉफीदरम्यान चाहत्याला दिली जबरी भेट, सोशल मीडियावर कौतूकांचा पाऊस