भारतीय क्रिकेट संघाचा युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचा आज (५ ऑक्टोबर) २३ वा वाढदिवस आहे. अत्यंत कमी कालावधीत भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा तो महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे. भारतीय संघाने 2021मध्ये ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या कसोटी मालिका विजयातही त्याचे न विसरता येण्याजोगे योगदान राहिले. मात्र, ‘वॉशिंग्टन सुंदर’ या नव्या दमाच्या भिडूबाबत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत हव्या.
नावामागे आहे ही रंजक कहाणी
वॉशिंग्टन सुंदर याचा जन्म चेन्नईतील हिंदू कुटुंबात झाला. मात्र, त्याचे वॉशिंग्टन हे नाव ऐकून अनेक जण बुचकाळ्यात पडतात. वॉशिंग्टनचे वडील एम सुंदर हे शाळेत असताना उत्कृष्ट क्रिकेट खेळत. त्यांच्या घरापासून काही अंतरावर पीडी वॉशिंग्टन हे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राहत. वॉशिंग्टन यांना एक दिवस एम सुंदर यांच्या खेळाविषयी समजले. ते स्वतः मरिना ग्राउंड येथे त्यांचा खेळ पाहण्यासाठी गेले. वॉशिंग्टन हे एम सुंदर यांचा खेळ पाहून अत्यंत प्रभावित झाले. वॉशिंग्टन यांनी एम सुंदर यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलत त्यांना खेळासाठी आणखी प्रोत्साहित केले.
एम सुंदर हे क्रिकेटमध्ये कारकीर्द करू शकले नसले तरी, वॉशिंग्टन यांच्याशी त्यांचे अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. सन १९९९ मध्ये वॉशिंग्टन यांचे निधन झाले. नेमकी त्याच वर्षी एम सुंदर यांना पुत्र प्राप्ती झाली. सुंदर यांनी वॉशिंग्टन यांच्या मदतीची जाण ठेवत आपल्या मुलाचे नाव वॉशिंग्टन असेच ठेवले. त्यांनी बारशाच्या विधीत आपल्या मुलाचे नाव श्रीनिवासन ठेवले होते. मात्र, पीडी वॉशिंग्टन यांच्या उपकाराची जाण राखत त्यांनी आपल्या मुलाचे नाव बदलले.
एका आयपीएल हंगामाने बदलले नशीब
बांगलादेश येथे झालेल्या २०१६ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात वॉशिंग्टन भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी करत तसेच, त्याची ऑफ स्पिन गोलंदाजी अनेकदा संघासाठी लाभदायक ठरली. त्याचवेळी आयपीएल २०१७ मध्ये अनुभवी रविचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाल्याने रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने १७ वर्षीय सुंदरवर विश्वास दाखवला. त्याने हा विश्वास सार्थ ठरवत संपूर्ण स्पर्धेत दमदार गोलंदाजी केली. क्वालिफायर १ मध्ये तो सामनावीर होता. एका कानाने कमी ऐकू येत असले तरी, आपल्या कामगिरीने तो खूप काही बोलला.
सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय
आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर लवकरच वॉशिंग्टनला भारतीय संघाकडून बोलावणे आले. १३ डिसेंबर २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध टी२० पदार्पण केले. या वेळी त्याचे वय अवघे १८ वर्ष व ८० दिवस असे होते. तो आजही भारताकडून टी२० पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे. त्यानंतर सातत्याने त्याला भारतीय संघात संधी दिली गेली. २०१८ निदहास ट्रॉफी या तिरंगी मालिकेत तो मालिकावीर ठरला. तो सातत्याने भारताच्या टी२० संघाचा सदस्य आहे. युएई येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघातील निवड जवळपास पक्की झाली होती. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाल्याने तो विश्वचषकासाठी निवडला गेला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दाखवला दम
भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने व उपलब्ध नसल्याने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील युवा संघापुढे मोठे आव्हान होते. ते आव्हान समर्थपणे पेलणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉशिंग्टनचा देखील समावेश होता. तीन कसोटीनंतर मालिका १-१ बरोबरीत असताना ब्रिस्बेन येथील अखेरच्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली.
स्टीव स्मिथसह तीन बळी मिळवत त्याने पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केला. फलंदाजी करताना सातव्या गड्यासाठी शार्दुल ठाकूरसह १२३ धावांची भागीदारी करून त्याने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवले. त्याने स्वतः ६२ धावांची खेळी केली. पुढे, भारताने अखेरच्या दिवशी सामना जिंकत एक ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
सूर्या दादा चमकला! मालिकावीर बनत पटकावले विराट- रोहितच्या खास यादीत स्थान, तुम्हालाही वाटेल अभिमान