कोरोना महामारीमुळे बंद असलेले क्रिकेट जुलै महिन्यापासून पुन्हा सुरू झाले आहे. विनाप्रेक्षक सुरू असलेले सामने देखील रंगतदार होत आहेत. सध्यातरी इंग्लंडमध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळले गेलेले आहे. इंग्लंडने कसोटी मालिकांत वेस्टइंडीज व पाकिस्तानला धूळ चारली तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिका जिंकल्या आहेत. दुसरीकडे, कॅरेबियन बेटांवर सीपीएल आपल्या अंतिम टप्प्यात आली आहे. या सगळ्यात एका चर्चेला सर्वात जास्त ऊत आला आहे तो म्हणजे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?
तसे पाहायला गेले तर, भारताचा कर्णधार विराट कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तुफान फॉर्ममध्ये असतो. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गेल्या दोन वर्षात एका खेळाडूने धुमाकूळ घातला आहे. एकदिवसीय सामन्यांत सहाव्या क्रमांकावर तर टी२० मध्ये सलामीला येत त्याने भलेभले गोलंदाज फोडून काढले आहेत. आयपीएलमध्ये सुद्धा त्याने धावांचे इमले रचले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे त्या, जोस बटलरचा आज वाढदिवस.
टॉन्टन येथे जन्म झालेला जोस लहानपणापासून खेळाडूवृत्तीचा होता. टॉन्टनच्या किंग्ज कॉलेजमध्ये असताना तो क्रिकेटसोबतच हॉकी देखील निपुणतेने खेळत. आज जो जोस रिव्हर्स स्वीप, स्कूपने गोलंदाजांची लय बिघडवतो त्यामागे हॉकीतील त्याची कौशल्ये आहेत.
बटलर आपल्या लहानपणाची एक कधीही न विसरता येणारी आठवण सांगताना म्हणतो, “१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध श्रीलंका सामना टॉन्टनच्या मैदानावर होत होता. मी आईसोबत सामना पाहायला गेलो होतो. त्याच सामन्यात, गांगुलीने १८३ तर राहुल द्रविडने १४३ धावांची खेळी केली होती. मी सीमारेषेपासून जवळ असल्याने, क्षेत्ररक्षण करत असलेल्या अरविंद डिसिल्वाकडे स्वाक्षरी घेण्यासाठी गेलो. मी त्याला माझा पेन व कागद सहीसाठी दिला. त्याने सही केली आणि पेन घेऊन पुढे गेला. पेन नेल्यामुळे मी मोठ्याने रडायला लागलो होतो.”
बटलरने आपल्या क्रिकेट प्रवासाला सॉमरसेटसोबत सुरुवात केली. सॉमरसेटच्या प्रत्येक वयोगट संघात त्याचा समावेश होता. २००९-१० मध्ये किंग्ज कॉलेजचे नेतृत्व करताना बटलरच्या नेतृत्वात किंग्ज कॉलेजने १७ पैकी अवघा एक सामना गमावला होता. त्याच्या कामगिरीची दखल घेत २०१० चा विस्डेनचा सर्वोत्कृष्ट शालेय खेळाडूचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता.
बटलरने आपल्या प्रथमश्रेणी पदार्पणत चक्क ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज जस्टिन लैंगरच्या जागी खेळत पदार्पण केले होते. सामन्याच्या काहीवेळ आधी दुखापतग्रस्त झाल्याने बटलरला ही संधी मिळाली होती. २००९ च्या चॅम्पियन्स लीग टी२० साठी, सॉमरसेटने त्याला संघात कायम ठेवले होते. सॉमरसेटच्या वरिष्ठ संघात देखील त्याची निवड जवळपास तीन वर्ष वाट पाहिल्यानंतर, जेव्हा क्रेग किस्वेटरला राष्ट्रीय संघात निवडल्यामुळे झाली. तेव्हापासून मात्र तो चमकत राहिला. २०१३ मध्ये सॉमरसेट सोडत त्यांनी लँकेशायर काउंटी क्लबसाठी खेळणे सुरु केले.
इंग्लंड संघात २०११ साली त्याची प्रथमता निवड झाली. पहिले तीन वर्ष आपलाच सॉमरसेटचा सहकारी क्रेग किस्वेटर व जॉनी बेअरस्टो यांच्यासमवेत त्याला स्पर्धा करावी लागत होती. आपल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर बटलरने दोघांनाही मागे टाकत इंग्लंड संघात यष्टीरक्षकाची जागा आपल्या नावे केली.
२०१५ च्या क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडचा नामुष्कीजनक पराभव झाल्याने सर्व संघाची नव्याने बांधणी करण्यात आली. यात, बटलर त्या काही प्रमुख खेळाडूंपैकी एक होता जे संघाच्या मुळ गाभ्याचा भाग राहणार होते. संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी
बटलरवर टाकण्यात आली. खरंतर ही जबाबदारी त्याने मिळवली होती. त्याच वर्षी इंग्लंडच्या कसोटी संघातून तो बाहेर गेला मात्र मर्यादित षटकांचे क्रिकेट त्याने दणाणून सोडले. ऑक्टोबर २०१७ मध्ये लुई वेबर हिच्यासोबत तो विवाहबंधनात अडकला.
बटलरच्या क्रिकेट कारकिर्दीला व आयुष्याला २०१८ हे वर्ष कलाटणी देणारे ठरले. फिनिशर म्हणून इंग्लंड संघात जबाबदारी पार पाडत असलेल्या बटलरला आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. पहिल्या काही सामन्यात तो फिनिशर म्हणून मधल्या फळीत फलंदाजीस येत. मात्र, दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या पावसामुळे कमी षटकांच्या झालेल्या सामन्यात राजस्थानने त्याला सलामीला पाठवले. राजस्थानचा हा डाव कमालीचा यशस्वी झाला. बटलरने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. तिथून पुढे राजस्थानचा नियमित सलामीवीर म्हणून तो पुढे आला. सलग पाच सामन्यात अर्धशतके झळकावत त्याने वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएल विषयी बटलर सांगतो,
“माझ्या आयुष्यात आयपीएलचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. रॉयल्सने मला सलामीची संधी दिल्यामुळे माझा खेळ बहरला व मी चांगली कामगिरी करण्यासाठी आतुर होऊ लागलो.”
आयपीएलमधील कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याची पुन्हा एकदा इंग्लंडच्या कसोटी संघात वर्णी लागली. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात तो इंग्लंडचा उपकर्णधार देखील झाला. २०१९ मधील बेन स्टोक्सनंतर सर्वाधिक चर्चिला गेलेला खेळाडू म्हणून, बटलरची निवड केली गेली. २०१९ आयपीएलमधील रविचंद्रन अश्विनने बटलरची केलेली “मंकडींग” आज देखील योग्य की अयोग्य यावरून चर्चा गरम करते.
२०१८ मध्ये सुरू झालेले बटलरचे चांगले दिवस २०१९ मध्ये द्विगुणीत झाले. आयपीएल खेळत असतानाच, लुई व जोस यांच्या संसारवेलीवर एप्रिल २०१९ मध्ये जॉर्जिया या परीचे आगमन झाले.
बटलरच्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च क्षणदेखील २०१९ मध्ये आला. मायदेशात झालेल्या क्रिकेट विश्वचषकात तो इंग्लंडचा उपकर्णधार होता. न्यूझीलंडला अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभूत करत इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला. बेन स्टोक्ससोबत निर्णायक भागीदारी करत, अर्धशतक झळकावून त्याने संघाला विजयाच्या नजीक नेले, तर अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये देखील महत्त्वपूर्ण आठ धावा त्याने केल्या. विश्वचषक विजयाचा अंतिम क्षण सुद्धा बटलरच्याच वाट्याला आला. न्यूझीलंडला विजयासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज असताना, जेसन रॉयच्या फेकीवर बटलरने गुप्टिलला धावबाद केले व विश्वचषक इंग्लंडच्या नावे झाला. २०१९ विस्डेनच्या मुखपृष्ठावर बटलरचाच आनंदी चेहरा दिसत होता.
एमएस धोनी व एबी डिव्हिलियर्स यांना आदर्श मानणारा बटलर सध्या तरी त्या दोघांच्याच वाटेने निघाला आहे. ज्या देशात क्रिकेट पसंत केले जाते, त्या सर्व देशात बटलरला अत्यंत प्रेम मिळते. खेळभावना जोपासून, मैदानावर कायम शांत राहात गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या जोस बटलरला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.