सन 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर मात्र इंडिया इंग्लंडमध्ये फक्त टूर करायला गेली. 2011ला तर अक्षरशः नाक कापले गेले. पुढच्या दोन टूरवर एकेक विजय मिळाला. मात्र, सीरिजचं स्वप्न अपूर्णच राहिलं. 2021 ला पाच मॅचेसची भलीमोठी टेस्ट सीरिज खेळायला टीम इंडिया पोहोचली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडला भारतात विराट सेनेने धूळ चारलेली. त्याच कॉम्फिडन्सने टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली.
पहिली टेस्ट ट्रेंट ब्रिजला. जवळपास दीड दिवस पावसाने खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे मॅच ड्रॉ राहिली. त्यानंतर दुसरी टेस्ट होणार होती लॉर्ड्सवर. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स. इथे खेळताना प्रत्येक जण आपल्या संघासाठी तर खेळतोच, पण वैयक्तिक खेळालाही तितकंच महत्त्व प्राप्त होतं. इंग्लंडचा कॅप्टन जो रूटने टॉस जिंकला आणि डोळे झाकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावले. त्यांना अपेक्षा होती की सकाळच्या वाऱ्यात टीम इंडिया ढेपाळेल. पण झालं उलटच. रोहित शर्माने असा काही काऊंटर अटॅक केला की, इंग्लंडला अख्खी एक सेशन विकेट पडली नाही. दुसऱ्या सेशनमध्ये रोहित 89 रन्स करून आऊट झाला. पहिल्या दिवशी पावणेतीनशे रन भारताने बनवले. केएल राहुलच नॉट आऊट शतक. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राहुल आणि रहाणे आऊट झाले. रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाने चाळीशीच्या इनिंग खेळत टीम इंडियाचा डाव 364 पर्यंत नेला. एक सन्मानजनक टोटल स्कोरबोर्डवर लागलेलं.
इंग्लंडने सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे जो रूट नडला. रोरी बर्न्सने 49 रन्स काढले. मिडल ऑर्डरमध्ये जॉनी बेअरस्टोने फिफ्टी मारली. बाकी कोणी रूटला फार साथ देऊ शकले नाही. 9 विकेट्स पडल्या तरी रुट हलला नव्हता. लास्ट मॅन जेम्स अँडरसन आला आणि खरा ड्रामा सुरु झाला. क्रिकेटमध्ये असा अलिखित नियम आहे की, तुम्ही अकराव्या नंबरच्या बॅटरला बाऊंसर मारू शकत नाही. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने नेमकं हेच केलं. त्याने अँडरसनला एकाच ओव्हरमध्ये धडाधड चार बाऊंसर मारले. अंपायरनेही मागचा पुढचा विचार न करता चार नो बॉल दिले. मात्र, बाऊंसर झेलून अँडरसन संतापला आणि बुमराहसोबत हुज्जत घालू लागला. तेवढ्यापुरतं ते प्रकरण मिटलं. अँडरसन आऊट झाला आणि इंग्लंडला 27 रन्सची नाममात्र लीड मिळाली.
टीम इंडियाची दुसरी इनिंग सुरू झाली आणि इंग्लंडच्या बॉलर्सने आपले खरे रूप दाखवले. स्विंग आणि बाऊन्सने टीम इंडियाला हैराण करून सोडले. रहाणेने तग धरला आणि फिफ्टी मारली. चौथ्या दिवशीचा खेळ संपला, तेव्हा टीम इंडियाची अवस्था होती. 6 विकेट 181. प्रमुख बॅटर रिषभ पंत आणि ईशांत शर्मा खेळत होते. इंग्लंडने जशी बॉलिंग केलेली त्यावरून अचानक इंग्लंडचे पारडे मॅचमध्ये जड झालेले. पाचव्या दिवशी दोन फोर मारून कडक सुरुवात करणाऱ्या रिषभला आऊट करून त्यांनी त्यात आणखी भर टाकली. इशांतही 16 रन्सची उपयोगी इनिंग खेळून आऊट झाला. मात्र, त्यानंतर घडलं ते केवळ अकल्पनीय आणि अविस्मरणीय.
आदल्या दिवशी ज्या बुमराहने टीम इंग्लंडशी पंगा घेतलेला तो बुमराह पिचवर आला. इंग्लंड टीमचा डोक्यात कालचा राग धुमसत होता. त्यांनी आल्या आल्या त्याच्यावर बाऊंसरची बरसात केली. इंग्लंड स्ट्रॅटजी विसरला आणि फक्त बुमराहला एंजर्ड करण्याच्या मागे लागला. दुसऱ्या बाजूला होता शमी. शमीलाही टेलएंडर समजण्याची चूक इंग्लंडने केली आणि घात झाला. तो बॅट फिरवत राहिला आणि रन्स येत राहिले. पाहता पाहता दोघांनी 50 रन्सची पार्टनरशिप केली. बाऊंसर झेलत, बीट होत ते इथपर्यंत पोहोचले. लंचच्या जस्ट आधी शमीने आपली फिफ्टी पूर्ण केली. ज्या लॉर्डसवर सचिन, पाँटिंग, डिविलियर्स या दिग्गजांना जे अभिवादन स्वीकारण्याचे भाग्य मिळाले नव्हते, ते शमीने मिळवले. लंचब्रेक झाला. आता इंग्लंडचे धाबे दणाणले होते. त्यांना शमी आणि बुमराह दाद देत नव्हते. लंचनंतर खेळ सुरू झाला आणि इंग्लंडची नवीन स्ट्रॅटजी काम करणारे इतक्यात तीन ओवरनंतर विराटने इनिंग डिक्लेअर केली. शमी-बुमराहची 89 रन्सची अभेद्य भागीदारी. शमी नॉट आऊट 56 आणि बुमराह नॉट आऊट 34 रन्स करून ड्रेसिंग रूमकडे येत असताना, साऱ्या क्राउडने आणि खासकरून लॉर्ड्सच्या त्या ऐतिहासिक लाँग रूममधील जुण्याजाणत्या इंग्लिश प्रेक्षकांनी जी स्टँडिंग ओवेशन दिली ती केवळ न विसरण्यासारखी.
गेम ऑन होता. इंग्लंडच्या हातात 60 ओव्हर आणि पूर्ण 10 विकेट्स. टार्गेट 272. इनिंग सुरू झाली आणि बॅटिंगमध्ये नाकीनऊ आणणाऱ्या शमी-बुमराहने पहिल्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडचे दोन्ही ओपनर माघारी पाठवले. हसीब हमीद आणि जॉनी बेअरस्टोचा काटा अनुभवी इशांतने काढला. टी पर्यंतच इंग्लंड 4 विकेट 67 अशी ढेपाळली. आता इंग्लंडला मॅच वाचवायची होती. कॅप्टन रूट ग्राउंडवर उभा होता. बटलर, मोईन अली, करन, रॉबीन्सन हे चार जण चांगले बॅटिंग करणारे होते. मात्र, टीम इंडियाला रिदम सापडलेला.
टी नंतर पहिली ओवर टाकायला आला बुमराह. तिसऱ्याच बॉलवर त्याने रूटला कोहलीकडे कॅच द्यायला लावत अर्धी मोहीम फत्ते केली. तिथून पुढे सुरू झाला सिराजचा जलवा. अगदी त्वेषाने पळत येत, आगीचे गोळे टाकावे असा तो बॉलिंग करू लागला. कोहलीने बटलरला एक जीवदान दिले. पण, मोईन अली आणि सॅम करनला लागोपाठ आऊट करून सिराजने इंग्लंडच्या आव्हानातील हवा काढून टाकली. इंग्लंड झटपटू लागली. बटलर-रॉबीन्सन भारताच्या पेस बॅटरीचा कसाबसा सामना करत होते. अखेर बुमराहने रॉबीन्सनचा 35 बॉलचा संघर्ष मोडून काढला. पुढील ओव्हर टाकायला येताच दुसऱ्या बॉलवर सिराजने बटलरला आऊट करून विजयाची औपचारिकता बाकी ठेवली.
पूर्ण स्टेडियममध्ये सिराज-सिराज आणि इंडिया-इंडिया असे नारे लागत होते, आणि अखेर तो क्षण आला. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अँडरसनला क्लीन बोल्ड करत सिराजने विजय भारताच्या पदरात टाकला. आठ ओवर राखून टीम इंडिया जिंकलेली. टीम इंडिया वेड्यासारखा जल्लोष करत होती. विराटचा ऍटिट्यूड पाहून प्रत्येकाला आपण ग्राऊंडवर असल्याचा भास होत होता. टीम इंडिया लीडमध्ये आलेली. पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल असा विजय साकार झालेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराजला का म्हटलं जातंय भारताचा डॉन ब्रॅडमन? पठ्ठ्याची डॉमेस्टिक कामगिरी आहे पुरावा, वाचाच
भारतातील सर्वात महागडे अन् यशस्वी कोच चंद्रकांत पंडित, ‘या’ संघाला विजयी बनवण्यासाठी मोजलेले दीड कोटी