---Advertisement---

विंडीजमध्ये 15 वर्षांनी जिंकली टेस्ट, आफ्रिकेत रचला इतिहास; तरीही द्रविडला का म्हणतात अपयशी कॅप्टन?

On: रविवार, मार्च 5, 2023 4:56 PM
Rahul-Dravid
---Advertisement---

भारतात प्रधानमंत्र्यानंतर सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल, तर ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची. टीम इंडियाचं कॅप्टनपद म्हणजे काटेरी मुकुटच. टीमने चांगला परफॉर्मन्स केला की, सर्वात जास्त उदोउदो कॅप्टनचाच होणार, आणि टीम अपयशी ठरली की, सर्वात पहिला घाव कॅप्टनच्याच मानगुटीवर बसणार. हा भारतीय क्रिकेटमधील अलिखित नियमच आहे. अगदी कर्नल नायडूंपासून आत्ताचा रोहित शर्मा हे कोणीच यातून सुटले नाहीत. बॅटिंगमधील निम्मेअर्धे रेकॉर्ड नावावर असलेल्या सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांना कॅप्टन्सी येत नाही, अशी समीक्षा गल्लीतील बरेच समीक्षक करताना दिसून येतात.

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅप्टन निवडायची जेव्हा वेळ येते तेव्हा, अनेक पर्याय उपलब्ध असतानाही दोन नावांवर जोरदार चर्चा होते. एक सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि दुसरा एमएस धोनी. गांगुलीने विदेशात जिंकायला शिकवलं, ऑस्ट्रेलियाला हरवलं, नेटवेस्ट जिंकली आणि 20 वर्षानंतर इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये नेलं, असा पोर्टफोलिओ गांगुलीचा दाखवला जातो. धोनीचं प्रोफाईल त्यामानाने तगडं. टी20 आणि वनडे असे दोन्ही वर्ल्डकप. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नंबर वन टेस्ट रँकिंग. आयसीसीच्या सर्व ट्रॉफी धोनीच्या हातात. बाकी सीरिज वगैरे तर बऱ्याच जिंकल्या. मात्र, या दोन ऑल टाईम ग्रेट कॅप्टनच्यामध्ये ज्याने एक छोटा, पण भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वपूर्ण काळ कॅप्टन म्हणून घालवला, त्या राहुल द्रविड (Rahul Dravid) याला अनेकजण सोईस्कररीत्या विसरून जातात. आज त्याच द्रविडच टीम इंडियातील कॅप्टन म्हणून योगदान किती? याचा उलगडा करणारा हा लेख.

आता द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेटमधील जवळजवळ देवमाणूसच. म्हणजे अख्ख्या करिअरमध्ये एखादा अपवाद सोडला, तर कोणाशी हाडतूड नाही की, कोणाशी भांडण नाही. टीमला गरज असेल ती भूमिका निभवायला तयार. तीन नंबरवरून ओपनर हो म्हटलं की झाला. फिनिशर बनवले गेले तिथेही तसंच योगदान. एक्स्ट्रा बॅटर खेळवायला मिळेल म्हणून अनेक वर्ष विकेटकिपिंग ग्लोव्हजही घातले. इतकंच नव्हे, तर बॉलिंगही केलीये आणि त्यात गॅरी कर्स्टनसारख्याला पवेलियनमध्येही पाठवलेय. अगदी जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे.

असंच अनपेक्षीतपणे टीम इंडियाचं नेतृत्व त्याच्याकडे आल. चॅपेल आले, वाद झाला, गांगुलीला हटवलं. सचिनने कॅप्टन व्हायला नकार दिला आणि “राहुल तूच कॅप्टन व्हायचं” असं म्हणलं गेलं. राहुल नेहमीप्रमाणे तयार होता. अनेक जण ‘स्टॅन्ड इन कॅप्टन राहुल द्रविड’ म्हणूनच त्याची थट्टा करत होते. कारण, सर्वांना असं वाटायचं गांगुली-चॅपेल वाद मिटेल आणि द्रविडला हटवून गांगुली पुन्हा कॅप्टन बनेल. मात्र, या पुढच्या गोष्टी होत्या. द्रविडने आपल्या नव्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित केलं.

द्रविडचा कॅप्टन म्हणून कार्यकाळ उण्यापुऱ्या दोन वर्षाचा. पण त्याच्यावर अपयशी कॅप्टन असा धब्बा लावायला एक घटना कारणीभूत ठरली ती म्हणजे 2007 वनडे वर्ल्डकप. सव्वाशे कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं ओझं घेऊन गेलेल्या टीम इंडियाला पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडावं लागल. खेळाडूंच्या घराबाहेर तोडफोड-जाळपोळ झाली. द्रविडच्या राजीनाम्याची मागणी केली गेली, पण त्यानंतर इंग्लंड टूरवर तब्बल 21 वर्षांनी टेस्ट सीरिज जिंकून दाखवायचा कारनामा द्रविडच्याच नेतृत्वात झाला. मात्र, त्यानंतरही त्याने लगेच राजीनामा देत फक्त खेळाडू म्हणून इथून पुढे भारतीय क्रिकेटची सेवा करण्याचे सांगितले.

मात्र, द्रविड खरंच अपयशी कॅप्टन होता का? असा प्रश्न विचारला गेला, तर उत्तर येईल नाही. कारण त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कामच तसं केलेलं.‌ इंग्लंड सीरिजचा उल्लेख वर आलाच. अगदी तसंच वेस्ट इंडीजमध्ये पंधरा वर्षांनी टेस्ट सीरिज टीम इंडियानं जिंकलेली. इतकंच काय दक्षिण आफ्रिकेत तर इतिहासात पहिल्यांदा टेस्ट जिंकवण्याचा मानही त्याचाच. विश्वास बसणार नाही, पण त्याच्या नेतृत्वातील सात टेस्ट सीरिजपैकी चार टीम इंडियाने जिंकलेल्या, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे विदेशात फक्त तीन टेस्ट हरलेल्या. वनडेतील स्थितीही काही वेगळी नव्हती. त्याच्या कॅप्टन्सीतील पहिल्या चारही सीरिज टीम इंडिया जिंकलीये. चेस करताना सलग 16 मॅच जिंकायचा वर्ल्डरेकॉर्डही त्याच्याच नेतृत्वात बनला, पण त्या वर्ल्डकपने त्याच्या कॅप्टन्सी करिअरवर डाग लागला.

द्रविडचं क्रिकेट करियर समृद्ध राहील. बॅटर म्हणून तो ग्रेट आहे. द लास्ट जंटलमन ऑफ द गेम, असं म्हणत त्याचं कौतुक केलं जातं. आज टीम इंडियाचा कोचही तो बनलाय. मात्र, त्याची ‘स्टॅन्ड इन कॅप्टन’ ही ओळख मात्र अजून काही पुसली गेली नाही हे दुर्दैव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॅप्टन’ विरुद्ध सिद्धू: अझहरूद्दीनमुळे नवज्योत पाजींनी अर्ध्यातच सोडलेला इंग्लंडचा दौरा, पण का?
क्रिकेटच्या इतिहासातील दुर्दैवी घटना! जहाज बुडाल्याने देशाची संपूर्ण क्रिकेट टीम पडलेली मृत्यूमुखी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---