चेन्नई मधील एक सुप्रसिद्ध टेनिस प्रशिक्षक टी.के. रामनाथन आपल्या क्लबमधील टेनिस कोर्टवर आपल्या मुलाला म्हणजे रामनाथन कृष्णन याला सांगत होते,
” तुला या मुलाला हरवायला जमेल का ? हा मुलगा कधीच हार मानत नाही आणि हरला ही नाही.”
रामनाथन कृष्णन जरा चकित झाला कारण, रामनाथन कृष्णन हा भारताचा त्या वेळेचा सर्वोत्तम टेनिसपटू होता. याच बरोबर त्या वर्षीच्या विम्बल्डन उपांत्य सामन्यापर्यंत त्याने मजल मारली होती. कोर्टवरचा तो १६ वर्षाचा, पाच फूट सहा इंच इतकी उंची लांब असलेला लहानसा मुलगा आपल्याला काय लढत देणार असे रामनाथन कृष्णनला वाटले.
तो मुलगा होता एन. श्रीनिवासन.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व व उच्च पदे मिळवलेले व्यक्ती म्हणजे नारायणस्वामी श्रीनिवासन. लहानपणापासून सधन घरात वाढलेले श्रीनिवासन हे आपले वडील इंडिया सिमेंटचे सहसंस्थापक टी.एस. नारायणस्वामी यांचे सुपुत्र होत.
आपल्या टेनिस कोचने म्हटल्याप्रमाणे एन. श्रीनिवासन यांनी कधीही हार मानली नाही. उद्योगपती म्हणून त्यांनी तमिळनाडूमध्ये खूप नाव कमावले होते. हातात भरपूर पैसा होता आणि पैसा असला म्हटल्यावर क्रिकेटकडे त्यांचे लक्ष जाणार नाही असे होऊ शकत नाही. एन. श्रीनिवासन यांच्याबाबतीतही हेच घडले.
श्रीनिवासन हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.सी. मुथय्या यांचा हात धरून क्रिकेट प्रशासनामध्ये आले. अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. यामध्ये शरद पवार, फारुख अब्दुल्ला, वायएसआर रेड्डी, पी चिदंबरम या दिग्गजांचा समावेश होता. २००५ मध्ये शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यावर श्रीनिवासन यांच्याकडे खजिनदार पदाचा कार्यभार देण्यात आला.
बीसीसीआयची सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाची मालकी देखील त्यांच्याकडे आहे. २००८ साली आयपीएलमध्ये इतर लोक गुंतवणूक करण्यास करण्यास घाबरत असताना, बीसीसीआयने प्रशासनातील लोक संघ विकत घेऊ शकतात असे नमूद केल्यानंतर श्रीनिवासन यांनी चेन्नई संघाची मालकी आपल्याकडे राखली. अशाप्रकारे एका संघाची मालकी आपल्याकडे ठेवणारे ते एकमेव पदाधिकारी होते.
२०११ साली शशांक मनोहर हे आयसीसी मंडळात सामील झाल्याने श्रीनिवासन यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद आले. २०१४ पर्यंत ते या पदावर कायम राहिले.
२०१३ सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग संघाचे सहमालक गुरुनाथ मयप्पन यांचे नाव आले. चौकशीचे धागेदोरे श्रीनिवासन यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. बीसीसीआयमधून ते बाहेर पडले तरी त्याच वर्षी नव्याने तयार झालेले आयसीसीचे चेअरमन हे पद त्यांच्याकडे आले.
एन श्रीनिवासन यांचा फक्त क्रिकेटच नाही तर अनेक इतर खेळांशी देखील निकटचा संबंध राहिलेला आहे. बीसीसीआयचे खजिनदार, बीसीसीआयचे अध्यक्ष ते आयसीसीचे चेअरमन या पदांसोबतच श्रीनिवासन यांनी तामिळनाडू गोल्फ फेडरेशन आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन या संघटनांचेदेखील अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचे बंधू एन रामचंद्रन हे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि जागतिक स्क्वॅश संघाचे प्रमुख होते.
श्रीनिवासन यांचे व्यक्तिमत्व जितके मोठे आहे, तितकेच वाद देखील त्यांच्या सोबत जोडले गेलेत. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्स मालक असल्याने तसेच बीसीसीआयचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या संघ विकत घेण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये जावई मयप्पन दोषी आढळल्याने त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. २०१५ विश्वचषका दरम्यान आयसीसीचे चेअरमन असलेले श्रीनिवासन यांनी विजेत्या संघाला चषक देऊ नये अशी मागणी त्यावेळचे आयसीसीचे अध्यक्ष कमाल मुस्तफा यांनी केली होती. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीने हा चषक प्रदान करणे हा खेळाचा अपमान आहे अशी त्यांची भूमिका होती. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भारती सिमेंट या कंपनीत श्रीनिवासन यांची भागीदारी आहे. यामध्ये तब्बल ३००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला जातो.
बीसीसीआय आणि आयसीसीची प्रमुख पदे भूषविल्यानंतर श्रीनिवासन पुन्हा तामिळनाडू क्रिकेट संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून परतले. २०१६ ते २०१९ असे तीन वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पडली. सध्या या संघटनेचे अध्यक्षपद त्यांची मुलगी रूपा मयप्पन ही संभाळते.
कशाचीही फिकीर न करणारा आणि मनमर्जी करणारा एक क्रिकेट प्रशासक म्हणून एन श्रीनिवासन यांना पूर्ण क्रिकेट जगतात कायमची ओळख मिळाली आहे.
वाचा- अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट