वयाच्या 16 व्या वर्षीच त्याची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. पुढे 18 व्या वर्षी भारतीय संघातही त्याने पदार्पण केले. त्यावेळी तो युवराज सिंग, मोहम्मद कैफ यांच्याबरोबरच भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणला जाऊ लागला. जसा कैफ भन्नाट झेल घ्यायचा तसा तो जबदस्त थ्रो करायचा. तो क्रिकेटपटू म्हणजे सुरेश रैना.
उत्तरप्रदेशच्या मुरादनगरमध्ये सुरेशचा 27 नोव्हेंबर 1986ला जन्म झाला. त्याचे वडील त्रिलोक चंद जम्मू-काश्मिरमधील रैनावाडी येथील मुळ रहिवासी असून आई धरमशाला, हिमाचल प्रदेशची मुळ रहिवासी आहे. पण रैना कुटुंब उत्तर प्रदेशमधील गझीयाबाद येथे स्थायिक आहे. सुरेशचे वडील निवृत्त मिलिटरी ऑफिसर आहेत. ते आर्मीमध्ये असल्याने घरी वातावरणही तसे शिस्तीचेच होते. सुरेशही तसा मेहनती होता. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर लखनऊ येथील क्रीडा विद्यालयात प्रवेश मिळवला. त्यामुळे 13-14 वर्षांचा असल्यापासून तो वसतिगृहात रहायचा. तिथे त्याला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. विविध खेळ खेळणारे खेळाडू तिथे शिकायला होते. त्यावेळी सुरेशचे रॅगिंगही खूपदा झाले. विशेष म्हणजे त्यावेळी त्याला अनेक कामेही स्वत: करावी लागायची. पण याचवेळी त्याचा क्रिकेट सरावही सुरु होता.
त्याला 2000मध्ये शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघाकडून त्याला इंग्लंडला जाऊन खेळण्याचाही अनुभव मिळाला. त्याची ही कामगिरी पाहून त्याला 16 व्या वर्षीच रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्याने 2003 ला आसामविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण या सामन्यानंतर त्याला पुढच्या मोसमापर्यंत उत्तरप्रदेश संघाकडून संधी मिळाली नाही. पण 2003 च्या अखेरीस तो पाकिस्तानला झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषकात खेळला. त्यापाठोपाठ त्याची 2004 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी निवड झाली. त्या विश्वचषकात त्याने 3 अर्धशतके केली. त्यात त्याने स्कॉटलँड विरुद्ध 38 चेंडूत 90 धावांची खेळीही केली. त्याविश्वचषकात रैनासह शिखर धवन, आरपी सिंग, अंबाती रायडू हे खेळाडू देखील खेळले.
2005मध्ये रैनाने अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याने त्या मोसमात 600 पेक्षाही जास्त धावा केल्या. त्याच वर्षी त्याने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली जुलैमध्ये श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून वनडे पदार्पण केले. पण पहिल्याच सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता. त्यावेळी संघात द्रविड, गांगुली, सेहवाग, सचिन, हरभजन, झहीर, धोनी असे दिग्गज खेळाडू होते. त्यावेळी शुन्यावर बाद झाल्याने निराश झालेल्या रैनाला हरभजनने समजावले होते की फलंदाजीत नाही काही करु शकला तर आता क्षेत्ररक्षण चांगले कर. त्यावेळी रैनाने हा विश्वास खरा ठरवताना श्रीलंकेचा कर्णधार मार्वन आट्टापट्टूला धावबाद केले होते.
रैनाने भारताकडून खेळताना 3 आणि 48 क्रमांकाची जर्सी वापरली आहे. गमतीचा भाग म्हणजे रैनाच्या आधीपासून भारतीय संघाकडून खेळत असलेला हरभजनही 3 क्रमांची जर्सी वापरतो. त्यामुळे रैनाला जेव्हा जेव्हा हरभजन संघात असेल तेव्हा तेव्हा 3 क्रमांकाची जर्सी घालता येत नव्हती. पण जेव्हा हरभजन खेळत नसायचा तेव्हा रैना त्याला फोन करुन विचारायचा की मी 3 क्रमांकाची जर्सी घालू का. 3 हा क्रमांक रैनासाठी जवळचा आहे. 3 या जर्सी क्रमांकामागील कारण सांगताना रैनाने सांगितले की त्याच्या लहानपणी त्याचे बाबा आर्मीमध्ये असल्याने ते आर्मीतील ऑफीसरसाठी बांधण्यात आलेल्या सोसायटीमध्ये रहायचे तिथे त्यांच्या घराचा क्रमांक 3 असा होता. तसेच त्याच्या घरातील सदस्य 3 क्रमांकाला शुभ मानतात. त्याचमुळे रैनाही 3 क्रमांकाची जर्सी घालतो. पण जेव्हा रैनाला 3 क्रमांकाची जर्सी घालता आली नाही तेव्हा त्याने 48 क्रमांकाची जर्सी घातली.
पुढे तो 2006 दरम्यान वनडे संघाचा नियमित सदस्य होता. पण खराब कामगिरीमुळे त्याला 2007 मध्ये केवळ 2 वनडे सामने खेळता आले. त्याला यावर्षी झालेल्या वनडे तसेच टी20 विश्वचषकासाठीही संधी मिळाली नाही. पण त्यावेळी त्याने 2007-08 च्या रणजी मोसमात 8 सामन्यात 48.78 च्या सरासरीने 683धावा केल्या. त्यामुळे त्याने पुन्हा जवळजवळ दीड वर्षाने भारतीय संघातील स्थान मिळवले. त्यानंतर मात्र तो पुढील 8 वर्षे नियमित भारतीय संघाचा भाग होता. यादरम्यान त्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याचे नाव कमावले. 2 वर्षे वनडे आणि टी20 संघात नियमित खेळत असलेल्या रैनाने 2010ला अखेर कसोटी संघातही स्थान मिळवले. त्याला दुखापतग्रस्त झालेल्या युवराज सिंगच्या ऐवजी स्थान मिळाले होते. त्याआधी तो केवळ मर्यादीत षटकांमध्ये खेळणारा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जात होता.
विशेष म्हणजे त्याने 2010ला कसोटी पदार्पण करण्याआधी झालेल्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले होते. तसेच त्याचवर्षी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे कसोटी पदार्पणातही त्याने दमदार शतक केले. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी20मध्ये शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. याचदरम्यान 23 वर्षांचा असताना रैनाला टी20 संघाचे कर्णधारपद मिळाले. यादरम्यानचा एक मजेदार किस्सा आहे. रैना हा जसा चांगला फलंदाज आहे. तसेच त्याला विविध पदार्थ बनविण्याचीही आवड आहे. जेव्हा त्याचा पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून दौरा होता तेव्हा त्याने अशोक डिंडासह संपूर्ण संघासाठी स्वयंपाकही केला होता. रैना हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताने नेतृत्व करणारा युवा कर्णधारही आहे.
पुढे 2007च्या विश्वचषकात संधी न मिळालेल्या सुरेशने 2011च्या विश्वचषकासाठी निवड झाली. पण त्याला साखळी फेरीत जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. तो त्यावेळी केवळ वेस्ट इंडीज विरुद्धच्या साखळी सामन्यात खेळला. पण त्यानंतर मात्र उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात त्याला अंतिम 11 जणांमध्ये स्थान मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेला उपांत्यपूर्व सामना युवराज सिंगच्या खेळीमुळे तर पाकिस्तानविरुद्ध झालेला उपांत्य सामना सचिन तेंडुलकरने केलेल्या झुंझार खेळीमुळे सर्वांच्याच लक्षात राहिला. पण याच सामन्यात रैनानेही निर्णायक भूमीका निभावली होती. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध युवराज बरोबर 6 व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 74धावांची भागीदारी केली होती. तर पाकिस्तानविरुद्ध अन्य फलंदाजांच्या विकेट जात असताना त्याने एक बाजू सांभाळत नाबाद 36 धावा करत भारताला 260 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. हा विश्वचषक भारताने जिंकला. या विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दौऱ्यातही तो खेळला. त्याने या दौऱ्यात बऱ्यापैकी कामगिरी केली. पण 2012 नंतर मात्र रैनाला कसोटी संघातून वगळण्यात आले. रैना चांगला खेळत असला तरी शॉर्ट बॉल खेळताना त्याला परदेशात संघर्ष करावा लागायचा. त्यामुळे 2011 नंतर रैना केवळ 3 कसोटी सामने खेळला.
पण असे असले तरी तो वनडे आणि टी20 संघाचा 2015 पर्यंत नियमित सदस्य होता. त्याने 2015चा विश्वचषकही खेळला. पण त्यानंतर त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले. 2015 नंतर तब्बल 3 वर्षांनंतर तो 2018 ला 3 वनडे सामने खेळले. यातील 2 डावात त्याला खेळण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर मात्र तो वनडे संघातूनही बाहेर पडला. टी20 संघातीलही त्याची हीच परिस्थिती राहिली. तो सातत्याने संघाच्या आत-बाहेर करु लागला. त्यात 2019च्या दरम्यान त्याच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो 2019च्या आयपीएलनंतर थेट 2021आयपीएलमध्ये सर्वांना दिसला.
Mr Suresh Raina underwent a knee surgery where he had been facing discomfort for the last few months. The surgery has been successful and it will require him 4-6 week of rehab for recovery.
We wish him a speedy recovery 🙏 pic.twitter.com/osOHnFLqpB
— BCCI (@BCCI) August 9, 2019
या काळात आयपीएलही प्रसिद्ध झाले होते. 2008ला रैनाला चेन्नई सुपर किंग्सने साधारण 3 कोटींमध्ये खरेदी करण्यात आले. त्याबद्दल बोलताना तो म्हणतो, आयपीएलमुळे आयुष्य बदलले. मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करु शकलो. तो आयपीएलमध्ये दमदार खेळ करत होता. त्यामुळे त्याला मिस्टर आयपीएल हे टोपन नाव देखील मिळाले. तो आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 205 सामने खेळले आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 205 सामन्यात 32.51 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रैनाने आत्तापर्यंत पहिल्या 12 आयपीएल मोसमात 350 पेक्षा कमी धावा केलेल्या नाही.
आयपीएलमध्ये रैना 3 क्रमांकाची जर्सी घालूनच खेळतो. पण जेव्हा 2018मध्ये हरभजनही चेन्नई संघात आला तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्यासमोर पंचाईत निर्माण झाली होती. पण त्यावेळी हरभजनने त्याच्या मुलीचा जन्म 27 तारखेला झाला असल्याने 27 क्रमांकाची जर्सी आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना घालायला सुरुवात केली.
रैनाकडे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण याबरोबर गायनाचीही कला आहे. त्याने 2015 मध्ये मिरुठीया गँगस्टर या बॉलिवूड चित्रपटात ‘तू मिली सब मिला हे’ गाणे गायले आहे. त्याचबरोबर त्याला सॅक्सोफोन हे वाद्य वाजवताही येते.
VIDEO: You've seen him on the field, but ever seen him SING a Kishore Kumar classic? Presenting – @ImRaina the SINGER #TeamIndiahttps://t.co/yhvRwmbnDd pic.twitter.com/llB03VW4fH
— BCCI (@BCCI) March 11, 2018
आयपीएलमध्ये दमदार खेळ केल्यानंतरही भारतीय संघातील वाढलेल्या स्पर्धेमुळे रैनाला मात्र 2018 नंतर भारतीय संघात संधी मिळालेली नाही. काल त्याने निवृत्तीची घोषणा केली. पण काहीही झाले तरी अनेकदा अफलातून क्षेत्ररक्षणाने, कधीतरी त्याच्या गोलंदाजीने ब्रेक थ्रू मिळवून देत तर अनेकदा वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर तळातल्या फलंदाजांच्या साथीने त्याने महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला. आजही जेव्हा जेव्हा भारताच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षांची चर्चा होते तेव्हा तेव्हा रैनाचे नाव आल्याशिवाय रहात नाही. ज्यावेळी भारताला गरज पडली तेव्हा आक्रमक खेळ करणारा तर एखादा गोलंदाज कमी पडला तर ती कमी भरुन काढणाऱ्या रैनाला विसरणे क्रिकेट चाहत्यांना तरी शक्य नाही.
-प्रणाली कोद्रे
याच लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर