भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी भारत दावेदार असल्याचे सांगितले आहे. या मालिकेकडून गावसकर यांना जास्त अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारत ही मालिका 3-1 ने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची नजर ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग तिसऱ्या कसोटी मालिका जिंकण्यावर असेल.
भारत 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांमधील या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. गावसकर यांनी एका स्तंभात लिहिले आहे की, ‘दोन्ही संघांमध्ये ज्या प्रकारचे प्रतिभावान खेळाडू आहेत, ते लक्षात घेता ही एक रोमांचक मालिका असेल. कसोटी क्रिकेट हा खेळाचे सर्वोत्तम स्वरूप का आहे हे या मालिकेतून सिद्ध होईल. भारत ही मालिका 3-1 जिंकेल असा माझा अंदाज आहे.’
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीबद्दल चिंता व्यक्त केली. यासोबतच मालिकेपूर्वी तयारीसाठी सराव सामने होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी जाहीर केली. त्यांनी लिहिले, ‘डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. मधली फळीही थोडी कमकुवत आहे. सेना संघाविरुद्ध परदेशात भारताची कामगिरी तितकी दमदार नसल्याने पहिली कसोटी महत्त्वाची असेल. मात्र, आज ज्या पद्धतीने कार्यक्रम तयार केला जातो त्यामुळे पाहुण्या संघाला अडचणी येतात.’
2020-21 मधील मालिकेत ॲडलेडमध्ये भारत 36 धावांवर ऑल-आऊट झाला होता. परंतु संघाने तेथून पुनरागमन करत गाबा येथे ऐतिहासिक विजय नोंदवला. 2014 पासून ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2018 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहास रचत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरलेला.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!