आयपीएलच्या धामधूमीनंतर भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२२च्या तयारीला लागला आहे. सध्या भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन दाखवत टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात दावा ठोकण्याची संधी भारतीय खेळाडूंकडे असेल. तत्पूर्वी माजी भारतीय कर्णधार आणि लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावसकर यांनी भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर सिद्ध होऊ शकणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
भारतीय संघात (Team India) एकाहून एक जबरदस्त खेळाडूंची भरमार आहे. दिनेश कार्तिकसारखा (Dinesh Karthik) फॉर्मात असलेला खेळाडू संघात असतानाही तो नव्हे तर, अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सर्वात मोठा गेमचेंजर (Team India’s Gamechanger) ठरू शकतो, असे मत गावसकरांनी व्यक्त केले आहे. हार्दिक बॅट आणि चेंडू दोन्हीसह चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता राखतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून त्याने ७ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना गावसकर म्हणाले की, “माझ्या हिशोबाने हार्दिक टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरणार आहे. फक्त विश्वचषकच नाही तर भारतीय संघ जितकेही सामने खेळेल, त्यामध्ये हार्दिकची भूमिका महत्त्वाची राहिल. हार्दिक विनासंशय भारतीय संघाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. त्यानंतर त्याने पहिल्या आणि दुसऱ्या बदलावर गोलंदाजी करण्यासाठी यावे. असे केल्यास हार्दिक भारतीय संघासाठी प्रमुख खेळाडू सिद्ध होईल. मी त्याला नव्या चेंडूनेही गोलंदाजी करताना पाहू इच्छितोय.”
हार्दिक मागील बऱ्याच काळापासून दुकापतीशी झुंज देत होता. त्याने २०२१ मधील टी२० विश्वचषकात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर गोलंदाजी करण्यास अक्षम असल्याने त्याने क्रिकेटपासून काही दिवसांसाठी दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यानच्या काळात त्याने आपल्या तंदुरुस्तीवर काम केले आणि आयपीएल २०२२ मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या हंगामात गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व करताना त्याने संघाला विजेताही बनवले. यादरम्यान त्याचे फलंदाजी आणि गोलंदाजीतील प्रदर्शनही प्रभावी राहिले. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळतानाही त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘शतकवीर’ टॉम ब्लंडेलने इंग्लंडच्या मैदानावर रचला इतिहास, विरोधी संघाच्या प्रशिक्षकाचाच मोडला रेकॉर्ड
भारतावर परमाणू बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तानी क्रिकेटर, ठोकलीत ३१ शतके






