सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामध्ये भारतीय फलंदाजी विभाग पूर्णपणे अपयशी ठरला. यानंतर अनेक दिग्गज मंडळींनी भारताच्या फलंदाजांना चांगली खरीखोटी सुनावली. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील कर्णधार विराट कोहलीच्या खराब शॉट निवडीबाबत भाष्य केले आहे.
गेल्या अनेक काळापासून विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याचा हा खराब फॉर्म इंग्लंड दौऱ्यात देखील कायम आहे. गावसकर यांच्या मते कोहली खराब शॉट निवडीमुळे मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने त्याच्या शॉटची निवड योग्यरीत्या करावी असेही मत व्यक्त केले आहे.
याबाबत सोनी स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले, “पाहा विराटची बॅट त्याच्या शरीरापासून किती लांब आहे. हेच त्याच्या अडचणीची बाब ठरत आहे. तो बाहेर निघून खेळत आहे. मला नाही वाटत क्रिजच्या बाहेर येऊन उभे राहणे चिंतेची बाब आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराच्या जवळून खेळत असाल आणि चेंडू सोडून देत असाल. खेळण्यात किंवा चेंडूला सोडून देण्यात काहीही वाईट नाही.”
“मला वाटते की हे संपूर्ण शॉट निवडीचा खेळ आहे. याला तुम्हाला अत्यंत सोपे ठेवावे लागेल. विराटने ८००० धावा केल्या आहेत. त्यातील शेवटच्या ६५०० धावा बनवताना तो क्रिजच्या बाहेर उभा राहिला होता. त्यामुळे मला नाही वाटत की, त्याला जास्त बदल करण्याची गरज आहे. मला वाटते की फक्त त्याने त्याच्या शॉट निवडीवर काम करावे,” असेही गावस्कर म्हणाले.
चेतेश्वर पुजारावर देखील केले भाष्य
पुजाराच्या खराब फॉर्मबाबत बोलताना गावसकर म्हणाले, “सध्या तरी हा एक निवडीचा प्रश्न आहे. म्हणजे असे काही चेंडू आहेत. जे खेळण्यापासून आपल्याला वाचायचे आहे, जे सोडून द्यायचे आहेत आणि हा सर्व निवडीचा भाग आहे. एकंदरीत शेवटी हा शॉट निवडीचाच विषय आहे.”
“तुम्हाला त्या चेंडूवर खेळायची गरज नाही, ज्यामुळे अडचण निर्माण होते. जर तुम्ही त्या चेंडूला सोडून दिले तर त्याने काही फरक पडणार नाही. तुमच्याजवळ आणखी एक दिवस होता आणि तुम्ही अजूनही १४० धावांनी पिछाडीवर होता. जर तुम्ही पाहिले इंग्लिश गोलंदाजांनी टाकलेले चेंडू चौथ्या स्टंपजवळ होता. याच्याही बाहेर चेंडू होते. एकंदरीत हे असे चेंडू आहेत जे आपल्याला अजिबात खेळायचे नाहीत,” असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, तिसरा कसोटी सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात काही बदलांचे संकेत दिले होते. त्यानुसार चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल झालेले दिसू शकतात. तसेच इंग्लंडचे २ खेळाडू मार्क वूड आणि क्रिस वोक्स हे देखील चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये देखील बदलाव होण्याची शक्यता आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी २ सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–शाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर
–‘सध्या कर्णधार कोहलीपुढे एकच पर्याय आहे, तो म्हणजे…,’ संघ निवडीबाबत दिग्गजाचा महत्त्वाचा उपदेश
–‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती






