मागील आयपीएल हंगामाचा उपविजेता संघ राजस्थान रॉयल्स 16 हंगामात चांगली कामगिरी करत आहे. मात्र, आयपीएलच्या 52व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने राजस्थानला 4 विकेट्सने पराभूत केले. तसेच, या विजयासह गुणतालिकेत एक स्थानाचा फायदा घेत नववे स्थान मिळवले. या विजयात हैदराबादच्या फलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 214 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 6 विकेट्स गमावत 217 धावा करत सामना 4 विकेट्सने खिशात घातला.
अब्दुल समदचा विजयी षटकार
या सामन्यात हैदराबादकडून युवा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 55 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांचाही समावेश होता. राहुल त्रिपाठी यानेही चांगली फलंदाजी केली. त्रिपाठीने 47 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर अनमोलप्रीत सिंग (33), हेन्रीच क्लासेन (26) आणि ग्लेन फिलिप्स (25) यांनी 20 हून अधिक धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना हैदराबादकडून अब्दुल समद (7 चेंडूत 17 धावा, 2 षटकार) याने विजयी षटकार मारत संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याने यादरम्यान 4 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
जोसची ‘बॉस’ खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून जोस बटलर (Jos Buttler) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 59 चेंडूत 95 धावांची वादळी खेळी साकारली. त्यात 4 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त संजू सॅमसन (Sanju Samson) याने नाबाद 66 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) यानेही 35 धावा केल्या आणि शिमरॉन हेटमायर 7 धावांवर नाबाद राहिला. मात्र, या सर्व खेळाडूंची खेळी व्यर्थ ठरली.
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना फक्त गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयसवालचा भीमपराक्रम! IPLमध्ये ‘यशस्वी’रीत्या 1000 धावा पूर्ण, दिग्गजांना पछाडत केला ‘हा’ विक्रम
असे 5 खेळाडू, ज्यांनी IPLमध्ये हैदराबादविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा; संजू 208 धावांनी विराटच्या पुढे