भारताला क्रिकेटवेड्यांचा देश असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय देखील अनेक घटनांमधून येत असतो. भारतात क्रिकेट माहित नसणारा व्यक्ती अपवादानेच सापडेल. अनेकदा चाहते क्रिकेटपटूंबद्दल असलेले प्रेम विविधप्रकारे व्यक्त करत असतात. कधी सुरक्षा तोडत थेट मैदानात घुसतात, तर कधी अनोखे पोस्टर झळकावतात, असे वेगवेगळ्या गोष्टीतून ते त्यांचे क्रिकेटवरील आणि क्रिकेटपटूंवरील प्रेम दर्शवत असतात. आता तर काही चाहत्यांचे क्रिकेटपटूंची टीव्हीवर आरती करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
नुकतीच शनिवारी आयपीएल २०२१ हंगामातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईला जरी पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांच्याकडून सुरेश रैना या अनुभवी खेळाडूने ताबडतोड ५४ धावांची खेळी केली.
तो या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तो फलंदाजी करत असताना एका चाहत्याने चक्क टीव्हीवर त्याची आरती केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/DhoniArmyKA/status/1380898290716221440
विराटचीही केली होती चाहत्याने आरती
आयपीएल २०२१ हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे सामना झाला. हा सामना सुरु होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट नाणेफेकीसाठी मैदानावर गेला असताना एका चाहत्याने टिव्हीवर त्याची आरती ओवाळली. विशेष बाब म्हणजे त्याने हाती आरतीचे ताट न घेता थेट हातावर वात ठेवून त्याची आरती केली. हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.
https://twitter.com/KishoreJSP_VK/status/1380331874124320770
रैनाने केलं आयपीएलमध्ये पुनरागमन
सुरेश रैनाने आयपीएल २०२० हंगामातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. त्यामुळे तो मागीलवर्षी युएईमध्ये पार पडलेल्या या हंगामात खेळताना दिसला नव्हता. मात्र, आता त्याने आयपीएल २०२१ हंगामातून पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्याने पुनरागमनही धडाक्यात झाले. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली.
प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाही
सध्या भारतात कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे सध्यातरी बीसीसीआयने प्रेक्षकांना मैदानात येऊन आयपीएल सामना पाहण्यास बंदी घातली आहे. सध्या आयपीएल २०२१ हंगामातील सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल
‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी
असं कोण मारतं भावा! सॅम करनने २ षटकारांसह केली मोठा भाऊ टॉमची धूलाई; एकाच षटकात चोपल्या २३ धावा