भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला कसोटी सामना कालपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने दमदार धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. कर्णधार जो रूटच्या द्विशतकाने इंग्लंडने ५०० धावांचा टप्पाही पार केला.
या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी पूर्णतः निष्प्रभ ठरली आहे. खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसली तरी गोलंदाजांनाही विशेष कमाल दाखवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे अशा खेळपट्टीवर फायदेशीर ठरू शकणाऱ्या चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला भारताने संघात स्थानच दिले नाही. आता या निर्णयावर टीका होऊ लागली आहे.
सुरेश रैनाने केले ट्विट
कुलदीप यादवला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीका केली. यात आता सुरेश रैनाचीही भर पडली आहे. दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना यश मिळत नसल्याचे पाहून रैना हैराण झाला होता. त्याने ट्विट करत आपले मत व्यक्त केले.
रैना म्हणाला, “भारतीय संघाला कुलदीप यादवची उणीव जाणवते आहे. त्याचे गोलंदाजीतील वैविध्य या खेळपट्टीवर नक्कीच कामात आले असते.” कुलदीप यादव मनगटी फिरकीपटू असल्याने खेळपट्टीकडून मदत मिळत नसताना देखील तो चेंडू वळवू शकतो. मात्र असे असतानाही भारताने त्याला अंतिम अकराच्या संघात स्थान दिले नाही.
Missing @imkuldeep18 in this test match. His bowling variations would have really contributed well. #INDvsENG
— Suresh Raina???????? (@ImRaina) February 6, 2021
दरम्यान, सामन्याचा दुसरा दिवसही इंग्लंडच्या नावावर राहिला. कालचा शतकवीर जो रूटने आपला शानदार फॉर्म कायम राखत आज द्विशतक झळकावले. त्याला बेन स्टोक्सने ११८ चेंडूत ८२ धावांची आक्रमक खेळी करत उत्तम साथ दिली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने ८ बाद ५४१ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक
अररर! केवळ ५ षटकात टीम इंडियाने सोडले २ झेल, रनआऊटची संधी अन् २ रिव्ह्यूही गमावले






