Suryakumar Yadav :- भारताचा स्टार करिकेटपटू सूर्यकुमार यादव हा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा अर्थात टी20 स्पेशालिस्ट फलंदाज मानला जातो. अलीकडेच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये संघाने 3-0 असा विजय मिळवला होता. त्याच्या या कागिरीनंतर सूर्यकुमार टी20 संघाचे नेतृत्त्वपद कायमस्वरुपी स्विकारू शकतो, असे म्हटले जात आहे. यादरम्यान सूर्यकुमारने आपल्याला भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असल्याचे सांगत मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. गौतम गंभीर संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. तो येताच त्याने सूर्यकुमारला टी20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. हार्दिक पांड्याला मागे टाकून सूर्यकुमार टी20 संघाचा कर्णधार बनला. टी20 विश्वचषकादरम्यान हार्दिक उपकर्णधारपदी होता, पण फिटनेसच्या समस्येमुळे कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक सूर्यकुमारपेक्षा मागे पडला.
मात्र टी20 संघाची कमान सांभाळूनही श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सूर्यकुमार भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याने बुची बाबू स्पर्धेत मुंबईसाठी एका सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध करून दिले. यावेळी राष्ट्रीय संघात आपण मर्यादित षटकांच्या क्रिकेटपुरतेच मर्यादित राहिल्याचे दु:ख सूर्यकुमारने बोलून दाखवले.
“मला भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे. बुची बाबू स्पर्धा खेळल्याने मला या मोसमात रेड-बॉल टूर्नामेंटसाठी चांगला सराव मिळेल,” असे सूर्यकुमारने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.
सूर्यकुमारने शेवटचा वनडे सामना गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. पण त्यानंतर त्याला वनडे संघात संधी मिळाली नाही. त्याने 2021 साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर केवळ 37 सामने खेळले आहेत. तर फेब्रुवारी 2023 मध्ये एकमेव कसोटी सामना खेळला होता. तर टी20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, 2021 मध्ये टी20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने 71 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज! म्हणाली, “तो माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही”
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!