मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आपल्या जवळपास बारा वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला प्रथमच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. युएई येथे झालेल्या आयपीएल २०२० मधील शानदार कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याची निवड झाल्याचे बोलले जात आहे. चौकार-षटकारांच्या आतिषबाजीने मैदान गाजवणाऱ्या सूर्यकुमारची ‘लव्ह स्टोरी’ देखील तितकीच रंजक आहे.
पोद्दार कॉलेजला झाली भेट
सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा यांची ओळख सर्वप्रथम २०१२ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध पोद्दार डिग्री कॉलेज येथे झाली. त्यावेळी सूर्यकुमार २२ तर नुकतीच बारावी पास झालेली देविशा १९ वर्षाची होती. त्यावेळी सूर्यकुमार वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करत होता. देविशा ही शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिच्या नृत्याने सूर्यकुमारला वेड लावले आणि सूर्यकुमारच्या आक्रमक फलंदाजीची ती चाहती बनली. जवळपास चार वर्ष एकत्र घालवल्यानंतर दोघांनीही २०१६ मध्ये या नात्याला नाव देत विवाह केला.
दक्षिण भारतीय आहे देविशा
सूर्यकुमारची पत्नी देविशा ही दक्षिण भारतीय आहे. त्यामुळे, दोघांनीही आपला विवाह दक्षिण भारतीय परंपरेनुसार केला होता. सूर्यकुमार खेळत असलेल्या अनेक सामन्यांवेळी ती चाहत्यांमध्ये बसलेली पहायला मिळते. सूर्यकुमार इतर खेळाडूंपेक्षा सोशल मीडियावर काहीसा कमी प्रमाणात व्यस्त असतो. सुर्यकुमारने मागील काही आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, तरीही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती.
गाजवला होता आयपीएलचा मागील हंगाम
सुर्यकुमारने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने युएई येथे झालेला २०२० आयपीएल हंगाम चांगलाच गाजवला होता. त्याने, १६ सामन्यात चार अर्धशतकांचा मदतीने व ४० च्या सरासरीने ४८० धावा ठोकल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १४५ असा कमालीचा राहिला होता. त्यानंतर झालेल्या, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मात्र तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. या स्पर्धेत पाच सामने खेळताना त्याने अनुक्रमे ७, ३८, ०, ८ व २२ धावा बनविल्या. त्यामुळे, त्याची भारतीय संघातील निवड ही आयपीएलच्या कामगिरी वरच झाल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsENG: संघनायकाची सुट्टी! टी२० बरोबर वनडे मालिकेतूनही जो रूट होणार बाहेर
INDvsENG: भारतीय टी२० संघात नको होते ‘हे’ तीन चेहरे, दुसरा आहे जबरदस्त फॉर्ममध्ये
टॉप-४ : असे खेळाडू ज्यांनी टीम इंडियाला जिंकून दिले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने