इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सुरुवातीची काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. मागील काही हंगामात धुव्वादार फटकेबाजी करत सूर्यकमारने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. नुकताच त्याने इंस्टाग्राम लाईव्हवर आयपीएल २०२० स्पर्धेतील जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.
आयपीएल २०२० स्पर्धेत एक प्रकरण प्रचंड गाजले होते, ज्याला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरले होते. तर झाले असे होते की, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये सामना सुरू असताना सूर्यकुमार तुफान फटकेबाजी करत होता. त्यावेळी विराट कोहली चिडून सूर्यकुमारला काहीतरी म्हणाला होता. ज्यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या.
इंस्टाग्राम लाईव्हवर एका युजरने सूर्यकुमारला याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, “मला आनंद आहे की, विराट माझ्यावर रागावला होता. परंतु सामना संपल्यानंतर तो माझ्यासोबत सामान्य गोष्टी बोलला होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “फक्त मीच नव्हे तर तो ज्यांच्याविरुद्ध खेळत असतो; त्यांच्याविरुद्ध आक्रमक होऊन कामगिरी करतो. मला तर खूप आनंद झाला होता की, विराटने माझी स्लेजिंग केली होती.”
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करत प्लेऑफ गाठले होते. सूर्यकुमार यादवने या सामन्यात ४३ चेंडूमध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने ७९ धावांची खेळी केली होती. याच सामन्यातील १३ व्या षटकात विराट कोहली सूर्यकुमार यादवला काहीतरी म्हणाला होता. परंतु यादवने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक
विराटच्या भिडूकडून रोहितचं भरभरून कौतुक; म्हणाला, “त्याच्यामुळेच मी आयपीएल खेळू शकलो”






