भारतात कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली चषक या स्पर्धेने रविवार पासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील यंदाचा आपला पहिला सामना खेळत असलेल्या बडोदा संघाने या अभियानाची सुरुवात विजयाने केली आहे. बडोदा संघाने आपला पहिला सामना उत्तराखंड संघावर 5 धावांनी मात करत जिंकला. बडोदा संघाच्या विजयाचा नायक कर्णधार कृणाल पंड्या ठरला.
कृणाल पंड्याने 42 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली. त्याने यामध्ये 5 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली. त्याचबरोबर 33 धावा देत त्याने 2 विकेट्स सुद्धा घेतल्या.कृणाल पंड्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 168 धावसंख्या उभारली होती. या प्रत्युत्तरादाखल उत्तराखंडचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा करू शकला. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात बडोदा संघाने 5 धावांनी विजय मिळवला. उत्तराखंड संघाकडून सर्वाधिक धावा दिक्षांशू नेगीने केल्या. त्याने 57 चेंडूत 77 धावांची नाबाद खेळी केली.
बडोद्याच्या रिलायन्स स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात उत्तराखंड संघाचा कर्णधार इकबाल अब्दुल्लाने नाणेफेक जिंकून बडोदा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. बडोदा संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी आपले सलामी फलंदाज केदार देवधर आणि निनाद राथवा यांना पावरप्लेच्या मध्येच गमावले. विष्णु सोळंकी सुद्धा 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार कृणाल पंड्याने यष्टिरक्षक समित पटेलला सोबत घेवून संघाचा डाव पुढे घेवून गेले. पंड्याने आक्रमक फलंदाजी करतांना अर्धशतक ठोकले. त्याने 42 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तसेच समित पटेलने 30 चेंडूत 41 धावांची खेळी साकारली.
उत्तराखंड संघाची सुद्धा सुरुवात खराब झाली. जय बिस्ता शून्यावर बाद झाला. पियुष जोशी 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर दिक्षांशू नेगी आणि कुणाल चंदेला या दोघांनी उत्तराखंड संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुणाल चंदेलाने 26 चेंडूत 48 धावांची खेळी केली. कर्णवीर कौशलने 15 धावांची खेळी केली. त्याचबरोबर दिक्षांशू नेगीने 57 चेंडूत 77 धावांची नाबाद खेळी केली. यांमधे त्याने 9 चौकार आणि 1 षटकार खेचला. बडोदा संघाकडून अतित सेठ आणि कृणाल पंड्या या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. चिंतल गांधीने 1 विकेट घेतली.
उत्तराखंड संघाकडून ए मधवाल आणि गिरीश यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. दोघांनी अनुक्रमे 16 आणि 34 धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
‘मैदानावर टिकायचं म्हणून तो चेंडू टोलवताना घाबरत होता’, ऑस्ट्रेलियन दिग्गजांची पुजारावर सडकून टीका