भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम सुरु आहे. या हंगामात सर्व संघांचे पहिल्या २ आठवड्यात किमान ४ सामने खेळून झाले आहे. अशातच या हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करत असलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन दुखापतीमुळे केवळ २ सामने खेळून उर्वरित आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर झाला आहे.
नटराजनने हैदराबादकडून सुरुवातीचे २ सामने खेळले होते. त्यानंतर तो दोन सामने संघाबाहेर होता. त्यानंतर गुरुवारी (२२ एप्रिल) असे वृत्त आले की नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातूनच बाहेर पडला आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, अशी माहिती स्वत: नटराजनने दिली आहे.
सनराजयझर्स हैरदाबादने नटराजनचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात नटराजनने म्हटले आहे की ‘मला यंदाच्या आयपीएल हंगामात न खेळण्याचे वाईट वाटत आहे. मी मागील हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर मी भारतीय संघाकडूनही खेळलो. त्यामुळे माझ्याकडून जास्त अपेक्षा होत्या. पण, दुर्दैवाने मला माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि त्यामुळे मी या हंगामात खेळू शकणार नाही.’
असे असले तरी नटराजनने त्याची शस्त्रक्रिया कधी होणार आहे आणि त्यातून सावरण्यास किती वेळ लागणार आहे हे सांगितले नाही. तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे याक्षणी बोलायला शब्द नाहीत. मी सनरायझर्स हैदराबादला या हंगामातील प्रत्येक सामन्यासाठी शुभेच्छा देतो.’ याबरोबरच त्याने हैदराबाद संघाचे, संघसहकाऱ्यांचे आणि सपोर्ट स्टाफचे त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
🗣️ "I'm sad to miss the remaining games this season."@Natarajan_91 has been ruled out of the tournament due to injury and we along with the entire squad wish him a speedy recovery 🧡#OrangeOrNothing #OrangeArmy #IPL2021 pic.twitter.com/b4mzS3Rfrp
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2021
नटराजनला गुडघ्याची दुखापत ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरु येथे देखील दाखल झाला होता. मात्र, या दुखापतीने आयपीएलदरम्यान पुन्हा डोके वर काढल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत खेळताना नटराजन पूर्ण तंदुरुस्त होता का, असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.
आयपीएल २०२० मुळे आला होता प्रकाशझोतात
टी नटराजन आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने या हंगामात भुवनेश्वर कुमारची कमी भरुन काढत हैदराबादकडून १६ आयपीएल सामन्यांत १६ बळी घेतले होते. या दरम्यान त्याची सरासरी ३१.५ अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक ६५-७० यॉर्कर चेंडू फेकले आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही नटराजन चमकला
नटराजनने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. खरंतर त्याची या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पणाची संधी मिळाली. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने १ वनडे, ३ टी२० आणि १ कसोटी सामना खेळताना एकूण ११ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलने विक्रमी अर्धशतक! पंजाब संघाच्या ‘या’ विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर झाला विराजमान
थ्री इन वन! राजस्थानचा गोलंदाज करतोय भज्जी, बुमराह आणि अश्विनसारखी गोलंदाजी, पाहा व्हिडिओ