---Advertisement---

‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी

On: सोमवार, ऑक्टोबर 25, 2021 9:10 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटामधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघांमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) बहुप्रतिक्षित सामना पार पडला. आजवर टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहिलेल्या भारतीय संघावर या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. शाहिन आफ्रिदीची भेदक गोलंदाजी आणि कर्णधार बाबर आझम व यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांच्या अभेद्य भागिदारीमुळे पाकिस्तानने भारतावर १० विकेट्स राखून सोपा विजय मिळवला. या सामन्यानंतर पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीचा प्रत्यय आला आहे.

तर झाले असे की, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावा केल्या होत्या. भारताच्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळ दाखवला.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या रिझवान आणि आझमने नाबाद १५२ धावांची प्रशंसनीय भागिदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा फटकावल्या. त्याच्या बरोबरीला कर्णधार आझमनेही ६८ धावा जमवल्या. ५२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या केली.

अनुभवी भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह अशा गोलंदाजांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला आणि १८ षटकांतच संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यांची ही फलंदाजी कामगिरी कौतुकास्पद ठरली. अगदी कट्टर विरोधक असलेल्या भारतीय संघाच्या संघनायक कोहलीलाही त्यांच्या खेळीने भुरळ घातली. कोहलीने पाकिस्तानच्या विजयानंतर स्वत: आझमकडे जात त्याच्याशी हात मिळवला आणि त्याची पाठ थोपटली. पुढे रिझवानला तर त्याने चक्क मिठी मारत खिलाडूवृत्तीचा प्रत्यय दिला. त्याच्या या कृतीने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.

विराटचा आझम आणि रिझवानची पाठ थोपटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. अनेकांनी त्याच्या या वागणूकीचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतावर पाकिस्तानचा ‘रिकॉर्डब्रेक’ विजय, क्रिकेटविश्वातील सुरमा संघांनाही न जमलेला केला पराक्रम

मुलगा आझमची यशस्वी कामगिरी पाहून भारावले स्टँड्समध्ये बसलेले वडील, अश्रू थांबता थांबेना; बघा भावूक क्षण

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला सामन्याचा आस्वाद; विजयानंतर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---