भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मधील त्यांच्या येत्या सामन्यात न्यूझीलंडला चितपट करण्यासाठी तयारी करण्यात व्यस्त आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघाला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवत हा संघ उपांत्य फेरीत धडक मारण्याच्या दृष्टीने वाटचाल करताना दिसेल. अशात गुरुवारी सकाळी (२८ ऑक्टोबर) भारतीय संघाचा भाग असलेला एक वेगवान गोलंदाज मायदेशी परतला असल्याचे समजत आहे. हा गोलंदाज आहे आवेश खान.
आयपीएल २०२१ मध्ये बऱ्याचशा युवा गोलंदाजांनी संघ निवडकर्त्यांना प्रभावित केले होते. याच कारणामुळे त्यांना युएईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषकासाठी नेट बॉलरच्या रुपात भारतीय संघासोबत जोडले गेले आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश याचाही समावेश होता. तो संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपेपर्यंत युएईतच थांबणार होता. परंतु आता त्याने स्वत: भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. वरती दुबईचे लोकेशन टाकत खाली त्याने ‘पुढचे स्टेशन दिल्ली’ असे लिहिले आहे. परंतु त्याचे मायदेशी परण्यामागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

आवेश आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा हुकुमी एक्का बनला आहे. त्याने आयपीएल २०२१ च्या हंगामात दिल्लीकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो आयपीएलमध्येही सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज राहिला आहे. त्याने या हंगामात १६ सामने खेळताना अकूण २४ विकेट्स आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत. सोबतच सातत्याने १४० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करत त्याने निवडकर्त्यांवरही आपली छाप सोडली आहे.
त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट हंगाम राहिला आहे. तो २०१७ पासूनच आयपीएलचा भाग राहिला आहे. परंतु त्याला खेळण्याची पुरेशी संधी न मिळाल्याने तो आपली प्रतिभा दाखवू शकला नाही. त्याने आतापर्यंत २५ आयपीएल सामने खेळताना एकूण २९ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वाह! श्रीलंकेविरुद्ध कसोटी अन् वनडेत जो विक्रम सचिन-युनूसने केला, तसा टी२०मध्ये वॉर्नरने करून दाखवला
फिंचचा मोठा कारनामा! ‘हा’ विक्रम करणारा ठरला ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पुरुष क्रिकेटर
वॉर्नरची बॅट तळपली! ३१ चेंडूत अर्धशतक करत विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान






