आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बुधवारी (८ सप्टेंबर) करण्यात आली. यावेळी भारतीय संघात ७ अशा खेळाडूंना सामील केले गेले आहे ज्यांचा हा पहिलाच विश्वचषक असणार आहे.
यामध्ये केएल राहुल, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. हा त्यांच्या पहिला विश्वचषक असला तरी या खेळाडूंची आकडेवारी पाहिली तर ती अप्रतिम आहे. हे विश्वचषकात मोठ-मोठ्या संघांसाठी आव्हान तयार करू शकतात. या लेखात आपण भारतीय संघातील या ७ खेळाडूंविषयी माहिती घेणार आहेत.
१. केएल राहुल : केएल राहुल हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत ४९ सामन्यांमध्ये ४० च्या सरासरीने १५५७ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ही कामगिरी १४२ च्या स्ट्राइक रेटने केली आहे, जो टी २० क्रिकेटच्या बाबतीत खूप चांगला आहे.
तसेच त्याचे आतापर्यंतचे टी२० क्रिकेटमधील आकडे पाहिले, तर त्याने १५७ सामन्यांमध्ये ४३ च्या सरासरीने ५१७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतक आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. सूर्यकुमार यादव : संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव आतापर्यंत केवळ ४ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. असे असले तरी त्याचे टी२० आकडे अप्रतिम आहेत. त्याने खेळलेल्या ४ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ४६ च्या सरासरीने १३९ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून स्ट्राइक रेट १७० चा होता.
सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो. त्याच्या आतापर्यांतच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १८१ सामन्यांमध्ये ३२ च्या सरासरीने ३८७९ धावा केल्या आहेत आणि यामध्ये २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
३. रिषभ पंत : २३ वर्षांच्या रिषभ पंतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगेल प्रदर्शन केले आहे. त्याने मोठ्या मोठ्या संघासोबत खेळताना संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने ३३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २१ च्या सरासरीने ५१२ धावा केल्या आहे. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याची संपूर्ण टी २० कारकीर्द पाहिली तर १२४ सामन्यांमध्ये १२४ सामन्यात ३३ च्या सरासरीने ३३३३ धावा केल्या आहेत आणि यामध्ये २ शतक आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या धावा १४८ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
४. राहुल चाहर : २२ वर्षीय भारताचा युवा फिरकीपटू राहुल चाहरने त्याच्या अप्रतिम प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो. त्याच्या संपूर्ण टी २० कारकिर्दीत त्याने ६६ सामन्यांमध्ये ८२ विकेट्स घेतल्या आहेत. यात एका सामन्यामध्ये एकदा ४ आणि एकदा ५ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन १४ धावा देत ५ विकेट्स असे आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत त्याने ५ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये इकोनाॅमी ७.५० पेक्षा जास्त आहे.
५. ईशान किशन : ईशान किशनचे वय २३ वर्ष असून त्यानेही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात चांगली केली आहे. त्याने ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४० च्या सरासरीने ८० धावा केल्या असून यात एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट १४५ चा आहे. तर संपूर्ण टी२० कारकिर्दीचा विचार केला, तर १०३ सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीने त्याने २५२५ धावा केल्या आहेत. यात २ शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
६. अक्षर पटेल : डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने त्याच्या संपूर्ण टी २० कारकिर्दीत १५६ सामन्यांत १३३ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२ टी२० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.
७. वरुण चक्रवर्ती : भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ टी २० सामन्यात २ विकेट्स घेतल्या आहेत. आणि त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीत २४ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ये दुख काहे खत्म नही होता’, धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होताच गौतम गंभीर आला चाहत्यांच्या निशाण्यावर
‘वाथी कमिंग’! धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होताच सोशल मीडियावर पडतोय प्रतिक्रियांचा पाऊस