येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा 15 सदस्यीय संघ निवडला जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) संघ सोपवण्याची अंतिम तारीख 1 मे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं शनिवारी ही माहिती दिली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला 25 मे पर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची संधी मिळेल.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रानं नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, “भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाईल. तोपर्यंत इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चा पहिला टप्पा संपेल. त्यावेळी राष्ट्रीय निवड समिती खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसचं मूल्यांकन करण्याच्या स्थितीत असेल.”
सूत्रानं सांगितलं की, “आयपीएलचा लीग टप्पा 19 मे रोजी संपल्यानंतर क्रिकेटपटूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला रवाना होईल. ज्या खेळाडूंचे संघ अंतिम चारसाठी पात्र ठरले नाहीत ते देखील गतवर्षीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्सप्रमाणेच लवकर जातील.” टी 20 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये केलं जात आहे.
याशिवाय काही ‘स्टँड बाय’ खेळाडू देखील संघासोबत प्रवास करतील अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मुख्य संघातील कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास किंवा त्यानं कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमुळे माघार घेतल्यास कोणतीही ‘लॉजिस्टिक’ समस्या उद्भवू नये. चारही राष्ट्रीय निवडकर्ते बहुतांश सामने पाहण्यासाठी प्रवास करतील. विश्वचषक स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूंला वर्कलोड मॅनेजमेंटबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याची माहिती आहे, कारण खेळाडू या दोन महिन्यांत आयपीएलमध्ये त्यांच्या फ्रँचायझींकडून खेळणार आहेत.
2024 टी 20 विश्वचषकाची सुरुवात अमेरिका विरुद्ध कॅनडा सामन्यानं होणार आहे. दोन्ही संघ ग्रांप्री स्टेडियममध्ये एकमेकांच्या आमनेसामने येतील. भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 27 जून रोजी होणार आहेत. यानंतर 29 जून रोजी विजेतेपदाचा सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 मध्ये दिसेल आता रिंकू सिंहचा जलवा! विराट कोहलीनं भेट केली आपली खास वस्तू
लखनऊनं कर्णधार बदलला? केएल राहुल टीममध्ये असतानाही नाणेफेकीसाठी निकोलस पूरन का आला?