आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना ग्रुप डीच्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार, ८ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये टिम सीफर्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने अफगाणिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आहे. तो या सामन्याचा सामनावीरही ठरला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयाने न्यूझीलंडने दोन अंक मिळवत अफगाणिस्तानविरुद्धचा मागील टी२० विश्वचषकाचा बदलाही पूर्ण केला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये गुलबदीन नईबने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे त्यांनी २० षटकात ६ विकेट्स गमावत १८२ धावा केल्या. यामध्ये न्यूझीलंडच्या सात खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. त्यामुळे मागील विश्वचषकात जो निकाल लागला तसाच आताही लागेल काय अशी चिन्हे दिसत होती. कारण या सामन्यात न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या दोन विकेट्स पहिल्याच दोन षटकात १४ धावांवर गमावल्या होत्या.
मुजीब उर रहमानने टाकलेले ते दुसरे षटक न्यूझीलंडसाठी डोकेदुखी वाढवणारे ठरले. त्याने लागोपाठ रचिन रविंद्र आणि फिन ऍलन यांना बाद केले. यामुळे पुन्हा एकदा मोठा उलटफेर दिसणार की असे वाटत असताना टिम सीफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. यावेळी टीमने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. दुसरीकडे फिलिप्सही फॉर्ममध्ये दिसला. त्याने २५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार मारत ४२ धावा केल्या.
फिलिप्सचा अडसर राशिदने दूर केला. मग आलेल्या मार्क चॅपमनसोबत ३६ धावांची भागीदारी केली. चॅपमन २८ धावा करत अझमतुल्लाह ओमरझईचा शिकार ठरला. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि मिचेल सॅंटनरने संघाचा डाव सांभाळला. डॅरिल २५ धावा आणि सॅंटनर १७ धावा करत नाबाद राहिले. न्य़ूझीलंडने १७.५ षटकातच हे लक्ष्य पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून मुजीबची गोलंदाजी उत्तम ठरली. त्याने ४ षटकात ३१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानने २०२४च्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडचा ८४ धावांनी पराभव केला होता. हा बदला पूर्ण करण्याबरोबरच न्यूझीलंडसाठी हा टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ठरला आहे.
या स्पर्धेत न्यूझीलंडचा पुढील सामना युएईविरुद्ध १० फेब्रुवारीला आणि अफगाणिस्तानचा ११ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.






