टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्यात यावेत, ही बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) मागणी आयसीसीने (ICC) फेटाळून लावली आहे. या प्रकरणावर 10 जानेवारीला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) संघातून बाहेर काढल्यापासून बांगलादेशने आक्रमक पवित्रा घेतला असून, आता बांगलादेश वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही काळापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध ताणलेले आहेत. बांगलादेशात दोन हिंदू तरुणांची झालेली हत्या आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार यामुळे भारतात संताप व्यक्त होत होता. याच पार्श्वभूमीवर केकेआरने 9.20 कोटींना खरेदी केलेल्या मुस्तफिजुर रहमानला (Mustfijur Rehman) संघात ठेवल्याबद्दल शाहरुख खान आणि केकेआरवर टीका होत होती.
वाढता विरोध पाहून बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजुरला मुक्त करण्याचे आदेश दिले. केकेआरने त्याला रिलीज केले असून लवकरच त्याच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा केली जाईल. मुस्तफिजुरला बाहेर काढल्यानंतर बांगलादेशनेही विरोधात काही पावले उचलली आहेत.
बांगलादेश सरकारने आयपीएलच्या (IPL) प्रक्षेपणावर बंदी घातली. तसेच आपले सर्व सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली. सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे 3 सामने कोलकाता आणि 1 सामना मुंबईत होणार आहे.
जर बांगलादेशने वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला संधी दिली जाऊ शकते. 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला जाण्यास नकार दिला होता, तेव्हा त्यांच्या जागी आयर्लंडला संधी मिळाली होती. सध्या तरी बांगलादेशने माघार घेण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला नाही, कारण मुस्तफिजुरच्या वादानंतरच त्यांनी आपला वर्ल्ड कप संघ जाहीर केला होता. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा सध्याचा पवित्रा पाहता काहीही घडू शकते.






