क्रिकेटविश्वात पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात होण्यास केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेला मिळाले असून पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळला जाणार आहेत. या स्पर्धेत गतविजेता भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताला काही संघांनी त्रास दिला ज्याच्याविरुद्ध संघ एकदाही विजय मिळवू शकला नाही, त्याबाबत जाणून घेऊ.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सर्वाधिक वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा भिडले आहेत. यामध्ये भारताने ७ विजय मिळवले असून पाकिस्तानला मात्र एकच सामना जिंकला आला. २०२६च्या आवृत्तीतही हे दोन संघ १५ फेब्रुवारीला समोरा-समोर येणार होते, मात्र पाकिस्तानने त्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध भारताची टी२० विश्वचषकातील कामगिरी माहित करून घेऊ. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत सात वेळा या स्पर्धेत खेळला आहे. त्यातील पाच सामने भारताने जिंकले, तर दोनमध्ये आफ्रिकन संघ विजयी ठरला. अफगाणिस्तान विरुद्ध भारताची कामगिरी अतिउत्तम आहे. टी२० विश्वचषकाच्या मागील आवृत्तींमध्ये झालेल्या चारही सामन्यात भारताने अफगाणिस्तानला पराभूत केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत टी२० विश्वचषकात ६ सामने खेळला. त्यामध्ये भारताने ४ सामने जिंकत वर्चस्व राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले. इंग्लंडनेही भारताचा चांगलेच प्रतिकार केला आहे. या दोघांमध्ये ५ टी२० विश्वचषकाचे सामने खेळले गेले. ज्यामध्ये भारताला तीन सामने तर इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत.
टी२० विश्वचषकात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठ्या संघांना पराभूत करणाऱ्या भारताला मात्र दोन संघांनी विजयाची चव चाखूच दिली नाही. ज्यांच्याविरुद्ध भारताला एकदाही विजय मिळवता आला नाही. त्यातील पहिला संघ तर श्रीलंका आणि दुसरा न्यूझीलंड. श्रीलंकेविरुद्ध भारताने दोन सामने खेळले असून दोन्हीमध्ये भारताचा पराभव झाला आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्ध तीन सामने खेळले होते ते तिन्ही सामने भारताने गमावले आहे.
न्यूझीलंड, श्रीलंकेनंतर भारताला वेस्ट इंडिजने अधिक त्रास दिला आहे. टी२० विश्वचषकात भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकता आला. तसेच बांग्लादेशविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्या विरोधात खेळलेले पाचही सामने भारताने जिंकले आहेत.
भारताची २०२६च्या स्पर्धेची सुरूवात युएसएच्या सामन्याने होणार आहे. ज्याच्याविरुद्ध भारताची कामगिरी चांगली आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा समोरा-समोर येणार आहेत. याआधी झालेला सामना भारताने जिंकला होता.
त्याचबरोबर भारताने नामिबिया, झिम्बाब्वे, नेदरलॅंड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध टी२० विश्वचषकाच्या मागील आवृत्तीत प्रत्येकी एक सामना खेळला असून तो जिंकलाही आहे.






