ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) सध्या पहिल्या फेरीचे सामने सुरू आहे, तर मुख्य फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधीच खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. विश्वचषकाआधीच काही प्रमुख खेळाडू दुखापतीने स्पर्धेबाहेर गेल्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या फेरी दरम्यानही अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होण्याच्या बातम्या पुढे येत आहेत. आतापर्यंत 4 खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. यामध्ये नवे नाव ऑस्ट्रेलियाचा युवा विकेटकीपर जोश इंग्लिस याचे आहे.
ऑस्ट्रेलियाचा युवा विकेटकीपर-फलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglis) याला गोल्फमध्ये दुखापत झाली होती. ती अधिक गंभीर असल्याने त्याला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले आहे. तो स्फोटक सलामीवीरही असून ऑस्ट्रेलियाला याचे किती नुकसान होते हे दिसेलच.
इंग्लिस हा टी20 स्पेशालिस्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने मागील वर्षी 118 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. त्याने टी20 ब्लास्टमध्ये 61 चेंडूत नाबाद 118 धावा केल्या होत्या. यामध्ये 8 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार, भारताविरुद्धच्या सराव सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ विश्रांती दरम्यान न्यू साउथ वेल्स येथे गोल्फ खेळण्याचा आनंद घेत होता. यादरम्यान इंग्लिसच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले गेले.
विश्वचषक सुरू होण्याआधी विकेटकीपर-फलंदाज जॉनी बेअरस्टो हा पण गोल्फ खेळताना जखमी झाला होता. त्यामुळे त्यालाही या स्पर्धेला मुकावे लागले. भारताचा रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडले होते. विश्वचषकाची पहिली फेरी खेळत असलेल्या श्रीलंका संघातील दुष्मंता चमिरा व प्रमोद मधुशान हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाले आहे. तसेच, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिसे टोप्ली हा देखील सराव सामने दरम्यान दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकाला मुकणार आहे.
गतविजेता ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर यंदाचा विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे ते विजयाचे प्रबळ दावेदारही मानले जात आहेत.