पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने बाजी मारली. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने होता. परंतु ऑस्ट्रेलियाचा ३३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने १९ व्या षटकात आक्रमक पवित्रा घेत षटकारांची हॅट्रिक केली आणि संघाला ५ विकेट्सने सामना जिंकून दिला. त्याच्या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
परंतु हाच फलंदाज आता लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. स्वत: वेडने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानविरुद्धचा सामना झाल्यानंतर वेड म्हणाला की, “मी उपांत्य सामन्यादरम्यान थोडा नर्वस होतो. मला माहिती होते की मी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची ही कदाचित शेवट वेळ असेल. मला फक्त माझे सर्वोत्कृष्ट द्यायचे होते आणि वास्तवात मला माझ्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा होता. जेणेकरुन आम्हाला या स्पर्धेत पुढे जाण्याची संधी मिळाली असती.”
“टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना कदाचित माझ्यासाठी क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. मी यापूर्वीही सांगितले आहे की, मी माझ्या निवृत्तीसाठी तयार आहे,” असे पुढे बोलताना वेड म्हणाला. यावरुन वेड लवकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकणार असल्याचे दिसते आहे.
यष्टीरक्षक फलंदाज वेडने पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद ४१ धावांची खेळी केली होती. ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ती झंझावाती खेळी करत संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले आहे. आता टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची लढत न्यूजीलंडशी होणार आहे. वेड आपला हा अंतिम सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे तो या सामन्यातही मोठी खेळी करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, ‘मी अजिबात खुश नाही…’
आणखी एक वेगवान गोलंदाज, जो फलंदाजीही करू शकतो; ‘दुर्लक्षित’ उनाडकटची निवडकर्त्यांना कोपरखळी
कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकटेचा समावेश, भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने सामने; पाहा वेळापत्रक