टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरीत अजेय राहिलेल्या पाकिस्तान संघासाठी या स्पर्धेचा शेवट अत्यंत दुर्देवी राहिला. गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे टी२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडच्या पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या १९ व्या षटकातील धुव्वादार फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने १ षटक बाकी असताना ५ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. यासह पाकिस्तान संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला.
यानंतर अनेकांनी मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडचा झेल सोडणाऱ्या हसन अलीला पाकिस्तानच्या पराभवाचा खलनायक ठरवले. परंतु पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने त्याचा होणारा जावई शाहिन आफ्रिदीवर पराभवाचे खापर फोडले आहे.
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिदने ‘समा टिव्ही चॅनल’वर बोलताना शाहिनचे कान उपटले आहेत. “मी शाहिनच्या प्रदर्शनावर अजिबात खुश नाही. हसन अलीने झेल सोडला. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही फलंदाजाला सलग ३ षटकार द्यावे. शाहिनकडे चांगला वेग आहे आणि तो समजदारीने आपल्या या कौशल्याचा वापर करू शकत होता. जरी महत्त्वपूर्ण झेल सुटला असला तरी त्याने त्याच्या अक्कलीचा वापर करायला पाहिजे होता,” असे तो म्हणाला.
पुढे आपले भाष्य सुरू ठेवत तो म्हणाला की, “जर त्याने आपले डोके लढवले असते आणि आपल्या गतीचा योग्य वापर करत ऑफ स्टंपच्या बाहेरुन यॉर्कर टाकले असते तर निकाल वेगळा लागला असता. तो अशाप्रकारचा गोलंदाज नाहीये, ज्याच्याविरुद्ध इतक्या सहजासहज धावा बनतील.”
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिनने टी२० विश्वचषकात प्रशंसनीय गोलंदाजी केली आहे. परंतु उपांत्य सामन्यात याच शाहिनला ऑस्ट्रेलियाच्या वेडने चांगलाच चोप दिला. त्याने पाकिस्तानच्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १७ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावांची झंझावती खेळी केली. यादरम्यान १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिनला त्याने सलग ३ षटकार खेचले. १९ व्या षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अशा सलग ३ चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत त्याने संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला आहे.
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची भिडंत न्यूझीलंडशी होणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुबई येथे हा सामना रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी
विराट सोडणार वनडे संघाचेही नेतृत्त्व? वाचा रवी शास्त्री काय म्हणतायेत
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’