टी-२० विश्वचषकात भारत त्याचा दुसरा सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून स्पर्धेतील स्थान भक्कम केले आहे. अशात भारतीय संघाला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये पोहोचण्याचा मार्ग जर सोपा करायचा असेल, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या फिटनेसमुळे संघाच्या चिंता वाढल्या आहेत. हार्दिकच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पंड्याला पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. शुक्रवारी ही चाचणी घेतली जाणार असून त्यानंतरच हार्दिकला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सामील करायचे की, नाही याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
हार्दिकला शुक्रवारी सराव सत्रात कमीत कमी तीन किंवा चार षटकांची गोलंदाजी करायला सांगितले जाऊ शकते. या सराव सत्रादरम्यान संघ व्यवस्थापन हार्दिकवर लक्ष ठेऊन असणार आहे. संघ व्यवस्थापन हार्दिकने सराव सत्रात केलेले प्रदर्शन पाहून तो पूर्णपणे फिट आहे की, नाही हे ठरवणार आहे. शुक्रवारच्या या चाचणीनंतर त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानाविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, हार्दिकने बुधवारी सराव सत्रात जवळपास १५ मिनिटे गोलंदाजी केली होती. यानंतर संघ व्यवस्थापनाची चिंता थोडी कमी झाली होती. हार्दिक मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे.
यापूर्वी हार्दिकने त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करणे बंद केले होते. त्यानंतर त्यांच्या संघातील स्थानाविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो पूर्णपणे फिट नसूनही त्याला संघात सामील केले गेल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात आता हार्दिकच्या संघातील स्थानाविषयी काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जीम ते इंग्लड व्हाया चेन्नई! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लिकल यांनी अशी फुलली प्रेम कहाणी
न्यूझीलंडविरुद्ध चौदा वर्षांचा जुना हिशोब चुकता करणार का टीम इंडिया अन् धोनी?






