श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून (२३ मे) ढाका येथे सुरुवात झाली. यजमान बांगलादेशने पहिल्या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्या सामन्यात अर्धशतक ठोकून बांगलादेशला चांगली सुरुवात देणारा कर्णधार तमिम इक्बाल याने या अर्धशतकी खेळी दरम्यान एक नवा विक्रम आपल्या नावे केला. तो आता बांगलादेशचा सर्वात यशस्वी सलामीवीर बनला आहे.
तमिमच्या नावे जमा झाला ‘हा’ विक्रम
बांगलादेशचा वनडे कर्णधार असलेल्या तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विशेष विक्रम नोंदविला आहे. सलामीवीर म्हणून त्याने १४,०११ धावा केल्या. सलामीवीर म्हणून १४ हजारांचा टप्पा पार करण्याची कामगिरी करणारा तो जगातील दहावा आणि बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तमीमने ५२ धावा करून या विक्रमाला गवसणी घातली. त्याने आपल्या खेळीदरम्यान ६ चौकार आणि १ षटकार लगावला. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ५१ वे अर्धशतक आहे. त्याने १३ शतकेही ठोकली आहेत. त्याने ७५०४ वन डे धावा देखील जमवल्या आहेत.
या दिग्गजांचा यादीत समावेश
सलामीवीर म्हणून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याने केला आहे. त्याने १९२९८ धावा केल्या आहेत. ख्रिस गेल (१८८३४ धावा) दुसर्या आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (१६९५० धावा) तिसर्या क्रमांकावर आहे. भारताच्या वतीने सचिन तेंडुलकर (१५३३५ धावा) आणि वीरेंद्र सेहवाग (१६११९) यांनी ही कामगिरी बजावली आहे.
अशी आहे तमिमची कारकीर्द
तमिम इक्बालच्या एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलताना त्याने ४१२ डावात ३५ च्या सरासरीने १४,०११ धावा केल्या आहेत. त्यात २३ शतके आणि ८९ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद २०६ धावा त्याची सर्वोच्च धावसंख्या असून या दरम्यान तो १६ वेळा नाबादही राहिला. ३२ वर्षीय तमीमने ६४ कसोटी सामन्यात ४७८८ धावा आणि ७८ टी२० मध्ये १७५८ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने ९ शतके आणि ३१अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर टी२० मध्ये एक शतक आणि ७ अर्धशतके त्याच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ‘हा’ फलंदाज; सीपीएलमध्ये पार पडणार कर्णधारपदाची जबाबदारी






