भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटू लाभले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील घावसर, कपिल देव अशा दिग्गजांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. सचिनने त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप कमी वयात म्हणजेच 16 व्या वर्षी सुरू केली होती. आता क्लब क्रिकेटमध्ये सचिनसाराखाच एक युवा खेळाडू समोर येत आहे. तन्मय मंजूनाथ नावाच्या या युवा क्रिकेटपटूने एक मोठा विक्रम केला आहे.
तन्मय मंजूनाथ (Tanmay Manjunath) यानेही वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मोठा कारणामा केला आहे. तन्मय कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनसाठी खेळतो. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 400 पेक्षा मोठी धावसंख्या खूप कमी वेळा बनली आहे. टी-20 क्रिकेट आल्यापासून संघ एकदिवसीय प्रकारात 400 धावांचा टप्पा पार करताना दिसू लागले आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाने वैयक्तिक 400 धावा केल्याचे कधी ऐकले आहे का? रोहित शर्मा याने केलेली 264 धावांची खेळी आजपर्यंतची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आहे. पण तन्मय मंजूनाथ याने कर्नाटक स्टेट क्रिकेटमध्ये खेळलेल्या एका सामन्यात वैयक्तिक 407 धावांची खेळी केली.
सागर क्रिकेट क्लब आणि भद्रावती एनटीटीसी क्लब यांच्यांतील हा सामना होता. तन्मय सागर क्रिकेट क्लबकडून खेळत होता. त्याने 50 षटकांच्या या सामन्यात एकट्याने 407 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 48 चौकार आणि 24 षटकार निघाल्याचे पाहायला मिळाले. त्याची ही खेळी लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आणि ते सर्वजण हा दिवस नक्कीच विसरू शकणार नाहीत. तन्मयच्या या 407 धावांच्या खेळीदरम्यान 336 धावा त्याने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर सागर क्लबने या सामन्यात तब्बल 583 धावांचा डोंगर उभा केला.
तन्मय सध्या नागेंद्र क्रिकेट अकादमी याठिकाणी क्रिकेटचे धडे घेत आहे. पण येत्या काळात लवकरच रणजी किंवा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळू शकते. तन्मयपूर्वी पृथ्वी शॉ आणि त्याच्यासारखे अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चांगले प्रदर्शन करून पुढे देशासाठी खेळले आहेत. तन्मयकडून देखील त्याचा कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना असाच अपेक्षा असल्याचे दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नर होणार निवृत्त? स्वतःच सांगितला आपला फ्युचर प्लॅन
VIDEO: सामना ऑस्ट्रेलियात, राडा पंजाबमध्ये! इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये दगडफेक