21 व्या फिफा विश्वचषकाला जगभरात चाहत्यांची काही कमी नाही. या विश्वचषकाला भारतातही मोठा चाहतावर्ग आहे.
याच विश्वचषकानिमित्तं कोलकात्यातील एका अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सींच्या चाहत्याने आपल्या या आवडत्या फुटबॉलपटूला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या तीन मजली घराला विश्वचषकात अर्जंटिना संघ ज्या रंगाचा पोषख घालून खेळणार आहे, चक्क त्या रंगाने रंगविले आहे.
कोलकात्यात 53 वर्षीय साहिब शंकर पात्रा एक चहाचे दुकान चालवतात. रशियामध्ये होत असलेल्या या विश्वचषकाला ते रशियामध्ये जाउन अर्जेंटिना आणि मेस्सींला पाठिंबा देणार होते. पण अर्थिक अडचणीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
त्यांनी रशियाला जाण्यासाठी 6000 रूपये जमा देखील केले होते. पण रशियाला जाण्यासाठी दीड ते दोन लाखांची गरज होती. जरी रशियाला जाता येत नसले तरी साहिब पात्रा निराश झाले नाहीत. त्यामुळेचं त्यानी मेस्सीला चिअर करण्यासाठी आपले घर अर्जेंटिनाच्या पोषाखाप्रमाणे रंगविण्याची शक्कल लढवली.
साहिब पात्रांना कोलकात्या ओळखत नाही असे कोणी नाही. त्यांच्या चहाच्या दुकानाचे नावही अर्जेंटिना टी स्टॉल असे आहे. ते दर विश्वचषकावेळी आपल्या घर व दुकानाला अर्जेंटिनाच्या लाइट ब्लू आणि पांढऱ्या रंगाच्या पोषखाप्रमाणे रंगवून अर्जेंटिनासाठी चिअर करतात.
साहिब पात्रा त्यांच्या कुटूंबात एकटेच मेस्सीचे चाहते नाहीत तर, त्यांची पत्नी सपना, 20 वर्षीय मुलगी नेहा आणि त्यांचा दहा वर्षाचा मुलगाही मेस्सींचे चाहते आहेत.
ते एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले 1986 मध्ये जेव्हा भारतात पहिल्यांदा विश्वचषकाचे प्रसारण झाले होते तेव्हा सारं कोलकाता शहर दिगियो मॅरेडोना यांचे फॅन झालेे होते. लिओनेल मेस्सीं त्यांचाच वारसा पुढं चालवत आहे.