भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्मास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. श्रीलंकेचा पहिला डाव झटपट गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताने गुंडाळला श्रीलंकेचा डाव
पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात २५२ धावा करून सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवसाअखेर श्रीलंकेचे सहा फलंदाज ८५ धावांमध्ये माघारी धाडले होते. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह याच्या ५ बळींच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. श्रीलंकेसाठी अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ४३ धावा केल्या.
भारतीय फलंदाजांची फटकेबाजी
भारतीय संघाचे दुसर्या डावात अत्यंत आक्रमक अंदाज दाखवला. कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांचे योगदान दिले. रिषभ पंतने भारतातर्फे कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने केवळ २८ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले. पहिल्या डावातील अर्धशतकवीर श्रेयस अय्यर याने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. भारताने ३०३ धावांवर आपला दुसरा डाव घोषित करत श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष दिले.
श्रीलंकेने गमावला पहिला बळी
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आधी श्रीलंकेला आपला दुसरा डाव सुरु करावा लागला. ७ षटकांच्या खेळात श्रीलंकेने लाहिरू थिरीमन्ने याचा बळी गमावला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने व कुसल मेंडिस अनुक्रमे १० आणि १६ धावा काढून नाबाद आहेत. तिसऱ्या दिवशी झटपट ९ बळी मिळवून भारतीय संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)





