भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies 3rd odi) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाला क्लिनस्वीप करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तसेच रोहित अँड कंपनीला आणखी एक मोठा विक्रम तोडण्याची संधी देखील असणार आहे.
सामना जिंकताच रचणार इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पहिली वनडे मालिका १९८३ मध्ये पार पडली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २१ वनडे मालिका झाल्या आहेत. या २१ वनडे मालिकांमध्ये भारतीय संघ एकही वेळेस वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप करू शकला नाहीये. तर वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला ३ वेळेस क्लीन स्वीप केले आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघांच्या दृष्टीने मोठा सामना असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ ३९ वर्षांपासून न तुटलेला रेकॉर्ड तोडू शकतो.
भारतीय संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल झाल्याचे पाहायला मिळू शकतात. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनला संधी दिली जाऊ शकते. तसेच श्रेयस अय्यरला देखील या सामन्यासाठी संघात स्थान दिले जाऊ शकते. मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, ” पुढील सामन्यात शिखर धवनला संधी दिली जाईल. ”
तसेच ६ महिन्यानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या कुलदीप यादवला देखील या संघात स्थान दिले जाऊ शकते. या सामन्यात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी एकत्र खेळताना दिसून येऊ शकते. तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरच्या ऐवजी दीपक चाहरला आणि मोहम्मद सिराजच्या जागी आवेश खानला संधी दिली जाऊ शकते.
दुसऱ्या वनडे सामन्यात मिळवला होता जोरदार विजय…..
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिज संघाचा डाव १९३ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाकडून मेगा लिलावाच्या प्लॅनचा खुलासा, ७ खेळाडूंना करणार टार्गेट
वनडे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग, धवनच्या पुनरागमनाचीही शक्यता
‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?