भारतीय क्रिकेट संघासाठी (team india) २०२१ वर्ष काही खास राहिले नाही. यावर्षी भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला. तसेच टी२० विश्वचषकातील (icc t20 world cup 2021) संघाचे प्रदर्शन देखील निराशाजनक राहिले. यावर्षी पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारताचा पराभव केला. अशात पुढच्या वर्षी संघ प्रदर्शनात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या वर्षी भारतीय संघासमोर सर्वात मोठी स्पर्धा टी२० विश्वचषक असेल. तसेच इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकासारख्या संघांविरुद्ध मालिकाही खेळायच्या आहेत. आपण या लेखात भारतीय संघाच्या २०२२ मधील नियोजित वेळापत्रकावर नजर टाकणार आहोत.
२०२२ मधील भारतीय संघाचे वेळापत्रक –
जानेवारी- भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबर पासून दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली, जो ३० डिसेंबरला संपेल. त्यानंतर तीन ते सात जानेवारीपर्यंत दुसरा कसोटी सामना होईल. तर ११ ते १५ जानेवारीदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील सामने १९, २१ आणि २३ जानेवारीला खेळले जातील.
फेब्रुवारी- दक्षिण अफ्रिका दौरा पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परत येईल. दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर संघाला वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मायदेशातील मालिका खेळायच्या आहेत. एकदिवसीय मालिकेतील सामने ६, ९ आणि १२ फेब्रुवारीला खेळले जातील. तसेच, टी२० मालिकेतील सामने १५, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान खेळला जाईल.
मार्च- श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना पाच मार्चला सुरू होईल आणि नऊ मार्चपर्यंत खेळला जाईल. तसेच, टी२० सामने १३, १५ आणि १८ मार्चला होतील. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आयपीएल २०२२ च्या तयारीला सुरुवात करतील. २०२२ मध्ये आयपीएलचा १५ वा हंगाम खेळला जाणार आहे, ज्याची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटी होऊ शकते.
एप्रिल- एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान मायदेशातील आयपीएल स्पर्धा खेळली जाईल. आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू व्यस्त असतील.
जून- आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची कसोटी आणि टी२० मालिका खेळणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेतील सामने ९, १२, १४, १७ आणि १९ जून या तारखांना खेळले जातील. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे.
जुलै- भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याव्यतिरिक्त कोरोनाच्या कारणास्तव २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेचा एक सामना स्थगित करण्यात आला होता. तो कसोटी सामनाही खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. आता या मालिकेतील पाचवा कसोटी सामना पुढच्या वर्षी एक ते पाच जुलै दरम्यान खेळला जाईल. त्यानंतर सात, नऊ आणि १० जुलै या तारखांना टी२० मालिका खेळली जाईल. तसेच एकदिवसीय मालिका १२, १४ आणि १७ जुलैला खेळली जाईल.
ऑगस्ट आणि सप्टेंबर- यादरम्यान आशिया चषकाचे आयोजन केले जाणार असून या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होऊ शकतो. आशिया चषकाच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर- पुढच्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये हा विश्वचषक खेळला जाणार असून भारतीय संघ यामध्ये चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्वाच्या बातम्या –
बंगलोरला हरवून ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य
अभिमानास्पद! प्रशिक्षक द्रविडने निभावली परंपरा, ‘या’ खास पद्धतीने सुरू केला चौथ्या दिवसाचा खेळ
विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना, पत्नी अनुष्का हॉटेलमध्ये करत होती असं काही; फोटो आला पुढे
व्हिडिओ पाहा –