---Advertisement---

विंडीज विरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाची झाली निवड

On: गुरूवार, नोव्हेंबर 21, 2019 9:33 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी आज(21 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड झाली आहे.

आज जाहीर झालेल्या वनडे आणि टी20 या दोन्ही भारतीय संघात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनाच सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही भारताच्या दोन्ही संघात पुनरागमन झाले आहे.

त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि दिपक चाहर या गोलंदाजांचाही भारताच्या दोन्ही संघात समावेश आहे.

तसेच मागील काही टी20 मालिकांसाठी वगळण्यात आलेल्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचेही टी20 संघात पुनरागमन झाले आहे. तसेच त्याचा वनडे संघातही समावेश आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकांसाठी भारताच्या संघात शिवम दुबेनेही त्याचे स्थान कायम राखले आहे. तसेच टी20 संघात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचेही पुनरागमन झाले आहे.

असे असले तरी संजू सॅमसनला मात्र भारताच्या टी20 संघातून वगळण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली होती. परंतू त्याला एकाही सामन्यात अंतिम 11 जणांमध्ये खेळवण्यात आले नव्हते.

तसेच खलील अहमद, शार्दुल ठाकूर, राहुल चाहर आणि कृणाल पंड्या यांनाही त्यांचे टी20 संघातील स्थान गमवावे लागले आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धची टी20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे आणि वनडे मालिका 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

वनडे संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

टी20 संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी , भुवनेश्वर कुमार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---