भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवरचा दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंडच्या संघाने गुडघे टेकले आणि भारतीय संघाने 151 धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने लॉर्ड्सवर तिसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे. या आधी कपिलदेव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लॉर्ड्सवर विजय मिळवण्याचा पराक्रम केला होता.
या विजयानंतर भारतीय संघाचे चौफेर कौतुक होत आहे. भारतीय संघाच्या विजयाचा डंका इतका जोरात आहे की, इंग्लिश मीडियासुद्धा कौतुक करायला मागे हटला नाही. 17 ऑगस्टच्या सकाळी डिजिटल आणि प्रिंट माध्यमांमध्ये फक्त विराट कोहलीच्या संघाचे कौतुक होताना दिसत होते. अनेक वर्तमानपत्रे जो रूटच्या रणनीतीवर टीका करताना दिसली.
त्याचबरोबर इंग्लंड दिग्गज क्रिकेटपटू जोफ्री बॉयकॉटनेही इंग्लिश संघाला फटकारले आहे. बॉयकॉटने टेलीग्राफसाठीच्या त्याच्या स्तंभात म्हटले आहे की, ‘इंग्लंड संघ हा फक्त कर्णधार रूटवर अवलंबून होता. त्यामुळे इंग्लंडला विजयापासून वंचित रहावे लागले.’
बॉयकॉट व्यतिरिक्त माजी इंग्लंड कर्णधार मायकेल वॉनने कर्णधार जो रूटच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वॉन म्हणाला की, ‘रूटने ज्या प्रकारे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्याविरुद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण लावले, ते अत्यंत चुकीचे होते.’
यानंतर उभय संघातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे होणार आहे. हा सामना जिंकत आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा भारताचा इरादा असेल. तर इंग्लंड संघ दुसऱ्या कसोटीतील चुका सुधारत दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मियाँ मॅजिक’पुढे इंग्लंडची पळता भुई थोडी, थरारक विजयानंतर कडक नाचला; व्हिडिओ तुफान व्हायरल
वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला
लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर