भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील विजयाचा आयसीसी संघांच्या क्रमवारीत भरपूर फायदा झाला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील तिनही सामने जिंकत झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघाने क्रमवारीत पाकिस्तान संघाला पिछाडीवर सोडले आहे. तसेच भारतीय संघ अव्वल ३ संघांमध्येही आला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघात १८ ते २२ ऑगस्टदरम्यान ३ वनडे सामने (3 Matches ODI Series) खेळले गेले. पहिला सामना १० विकेट्सने जिंकत भारतीय संघाने (Team India) या मालिकेची धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आणि त्यांनी ५ विकेट्सने विजय मिळवला. पुढे सलग तिसरा सामना जिंकत भारतीय संघाकडे झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्वीप करण्याची संधी होती. ही संधी त्यांनी हातून दवडू दिली नाही. अटीतटीच्या तिसऱ्या वनडेतही भारताचा १३ धावांनी विजय झाला.
अशाप्रकारे सलग ३ वनडे सामने जिंकल्याने भारतीय संघाला आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत (ICC ODI Ranking) चांगलाच फायदा झाला आहे. भारतीय संघ आता संघांच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यांनी ३१ सामन्यांमध्ये १११ रेटिंग पॉईन्ट्स झाले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा एका स्थानाने पुढे आहे.
पाकिस्तानचा संघ नुकताच नेदरलँडचा दौरा संपवून आशिया चषक २०२२ साठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाला आहे. पाकिस्ताननेही नेदरलँडविरुद्ध ३ वनडे सामने खेळताना ३-० असा विजय मिळवला आहे. यामुळे त्यांचे रेटिंग पॉईन्ट्स वाढले असून त्यांनी चौथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या खात्यात सध्या १०७ रेटिंग पॉईन्ट्स आहेत.
अव्वलस्थानी न्यूझीलंडचा दबदबा
दुसरीकडे आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ अव्वलस्थानी आहे. त्यांचे १९ सामन्यात सर्वाधिक १२४ रेटिंग पॉईन्ट्स आहेत. न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ २७ सामन्यात ११९ रेटिंग पॉईन्ट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Photo: ‘या’ भारतीय क्रिकेटरची होणारी पत्नी आहे सौदर्यांची खाण, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते मात
शुबमन गिलचा फॅन निघाला ‘हा’ झिम्बाब्वेचा खेळाडू, २५ वर्षानंतर भारताविरुद्ध घेतल्या पाच विकेट्स
भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर