काही वर्षांपूर्वी इरफान पठाण आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण यांनी अष्टपैलू म्हणून भारताकडून चांगला खेळ दाखवला. मात्र, त्यांना खेळात सातत्य राखता आले नाही. परिणामी, त्यांना लवकरच भारतीय संघातून वगळण्यात आले. सध्याच्या भारतीय संघात अशीच एक अष्टपैलू भावांची जोडी आहे जी, सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आक्रमक फटके खेळू शकते. तसेच, आपल्या उपयुक्त गोलंदाजीने, कर्णधाराला गोलंदाजीचे अनेक पर्यायही मिळवून देते. भारतीय क्रिकेटमधील भावांची नवीन जोडी म्हणजे हार्दिक आणि कृणाल पंड्या. त्यापैकी कृणाल आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
हलाखीची परिस्थिती आणि किरण मोरेंची साथ
कृणालचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी गुजरातच्या सूरत येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव हिमांशु आणि आईचे नाव नलिनी पांड्या आहे.
हिमांशू पंड्या हे हार्दिक आणि कृणाल लहान असताना गुजरात राज्यातील सूरत शहरात वित्तपुरवठ्याचा (फायनन्स) व्यापार करत असायचे. मात्र काही कारणास्तव १९९८ मध्ये त्यांना आपला व्यापार बंद करावा लागला. त्यानंतर आपल्या कुंटुंबासह ते आपले मुळगाव वडोदरा येथे स्थायी झाले. त्यावेळी हार्दिक आणि कृणाल जवळपास ६-७ वर्षांचे होते.
हिमांशू पंड्या यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे कामातून वेळ काढून ते आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट सामने पाहायला घेऊन जात असत. इथूनच हार्दिक आणि कृणाल यांना क्रिकेटपटू बनण्याची प्रेरणा मिळाली. लहान असले तरी आपल्या मुलांमध्ये एक चांगला क्रिकेटपटू होण्याइतपत क्षमता असल्याचे पाहून हिमांशू यांनीही त्यांना भविष्यात क्रिकेट क्षेत्रात पाठवण्याचे मनाशी पक्के केले.
वडोदरा येथे आल्यानंतर कृणाल व त्याचा लहान भाऊ हार्दिक हे लहान-लहान स्पर्धांमध्ये खेळत. दोघेही भाऊ अत्यंत आक्रमक फलंदाजी करत. अशाच एका स्पर्धेत भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांची पंड्या बंधूंवर नजर पडली. मोरे यांनी त्या दोघांना आपल्या अकादमीत येण्यास निमंत्रित केले. मोरे यांच्या अकादमीत प्रवेश घेण्यासाठी त्या दोघांकडे पुरेसे पैसे नव्हते. मोरे यांनी त्या दोघांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. मोरे यांच्या अकादमीत सहभागी झाल्यानंतर दोघांचा खेळ कमालीचा बदलला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन्ही भाऊ, मॅगी खाऊन दिवस काढत. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने पांड्या बंधूंचे नाव बडोदा क्रिकेट वर्तुळात चांगले गाजत होते.
कधी-कधी तर सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात पाच रुपयांच्या मॅगीवर पंड्या बंधूंनी आपले पोट भागवले आहे. पैश्यांच्या तंगीमुळे त्यांना सराव करत असताना आपल्या मित्रांकडे त्यांचे क्रिकेट किट मागावे लागत असे. मात्र हिमांशू यांच्या मानसिक प्रेरणेमुळे त्यांना सतत हिम्मत मिळत असे.
पुढे हार्दिक आणि कृणालने आपल्या मेहनतीने स्थानिक क्रिकेट स्पर्धांपासून ते जगप्रसिद्ध आयपीएलपर्यंतचा प्रवास केला.
आयपीएलने बदलले आयुष्य
कृणालचा लहान भाऊ हार्दिक हा २०१५ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात निवडला गेला. हार्दिकने आपल्या तुफानी फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली. लवकरच त्याने भारतासाठी देखील पदार्पण केले. लहान भाऊ पुढे गेल्यावर कृणालही जास्त काळ मागे राहिला नाही. २०१६ मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्यासाठी पदार्पण केले. त्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृणाल बडोदासाठी सर्वाधिक धावा काढणारा तसेच सर्वाधिक बळी मिळवणारा खेळाडू ठरला होता. लहान भावाप्रमाणे तोदेखील लगोलग चर्चेत आला.
हार्दिकप्रमाणे कृणालचे भाग्यदेखील आयपीएलमध्ये बदलले. २०१६ आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची बोली लावली. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध केलेली ३७ चेंडूतील ८६ धावांची खेळी आजही लोक विसरले नाहीत. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटला पराभूत करून तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. त्या अंतिम सामन्याचा मानकरी होता कृणाल पंड्या. त्याच वर्षी त्याचा भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या अ संघात समावेश केला गेला.
आंतरराष्ट्रीय पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा आणि आयपीएलमधील चमकदार कामगिरीचे बक्षीस त्याला लवकरच मिळाले. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या तिसऱ्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावत त्याने आपली निवड सार्थ ठरवली. संघाच्या आतबाहेर होत तो आतापर्यंत १९ टी२० सामने खेळला आहे.
…आणि तो दिवस उजाडला
सन २०२१ च्या सुरुवातीलाच पंड्या बंधूंवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या मुलांना क्रिकेटपटू बनवायचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते त्यांचे वडील हिमांशु यांचे आकस्मित निधन झाले. मात्र, लवकरच त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा क्रिकेटकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. २०२१ विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृणालकडे बडोद्याचे कर्णधारपद होते. कर्णधारपदाला साजेशी अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली. त्याचे बक्षिस म्हणून त्याचा प्रथमच भारताच्या वनडे संघात समावेश केला गेला.
इंग्लंडविरुद्धच्या पुणे येथील २४ मार्च २०२१ रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात त्याचा अंतिम ११ मध्ये समावेश केला गेला आणि त्याने ही संधी हातची जाऊ दिली नाही. संघ अडचणीत असताना त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. इतक्या वर्षाचा देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभव पणाला लावत त्याने अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक ठोकून, पदार्पणात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केला. एक प्रकारे त्याने स्वतःलाच स्वतःच्या ३० व्या वाढदिवसाची भेट दिली.
भारतीय वनडे संघाला सध्या फिरकी गोलंदाजी व आक्रमक फलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची नितांत गरज आहे. ही गरज कृणालच्या रूपाने पूर्ण होऊ शकते. दोन्ही भाऊ मिळून भारतीय संघाला भविष्यात अनेक संस्मरणीय विजय मिळवून देतील, अशी अपेक्षा चाहत्यांना नक्कीच असणार आहे.
हेही वाचा- एकेकाळी मॅगी खाऊन ढकलत होता दिवस; आज मनगटावर १ कोटीचं घड्याळ