बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) सुरू झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या टी२० मालिकेपासून भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. रवी शास्त्री यांच्यानंतर भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यापुढे भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपदे मिळवून देण्याचे आव्हान असेल. त्याचवेळी, द्रविड यांच्यासह भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल झाले आहेत. आपण आज द्रविड यांच्या नव्या सहकार्यांविषयी जाणून घेणार आहोत.
विक्रम राठोड-
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ वनडे विश्वचषकानंतर भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांच्या जागेवर माजी क्रिकेटपटू विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. टी२० विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र, त्यांनी आणखी काही काळ आपण भारतीय संघासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा भारतीय संघासोबत काम करण्याची संधी देण्यात आली.
पारस म्हांब्रे-
मागील अनेक वर्षांपासून राहुल द्रविड यांच्यासोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, भारत अ आणि एकोणीस वर्षाखालील संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी कसोटीपटू पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भरत अरुण त्यांची जागा घेतली. द्रविड यांचे विश्वासू सहकारी असलेले पारस हे भारताच्या युवा तरुण गोलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात.
टी दिलीप-
आर श्रीधर यांच्यानंतर रिक्त झालेल्या भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी अभय शर्मा व टी दिलीप यांच्यामध्ये स्पर्धा होती. मात्र, अभय शर्मा यांना मागे टाकत टी दिलीप यांनी हे पद आपल्या नावे केले. टी दिलीप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागील दोन वर्षापासून काम करत आहेत. यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली होती.