भारतीय संघ यावर्षी टी२० विश्वचषकात काही खास कमाल करू शकला नाही. सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघ त्यांचा टी२० विश्वचषकातील शेवटचा सामना नामिबियासोबत खेळला. यानंतर संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास संपला आहे. टी२० विश्वचषकात भारतीय संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
यावर्षी टी२० विश्वचषकात भारतीय संघासोबत ते सर्व झाले, जे यापूर्वी त्यांच्योसोबत कधीच झाले नसावे. पाकिस्तानने यावर्षी पहिल्यांदाच विश्वचषकात भारतावर विजय मिळवला, तो देखील तब्बल १० विकेट्सने. पाकिस्तानकडून पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्याची मोठी संधी मिळाली नाही.
पाकिस्ताननंतर दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडनेही पराभूत केले आणि संघाची स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याची शक्यता खूपच कमी वाटू लागली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला पराभूत करून भारताने त्याचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले होते. मात्र, त्यानंतर भारताला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागले.
रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि भारतीय संघ उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. त्यानंतर भारताला त्यांचा टी२० विश्वचषकातील शेवटचा सामना नामिबियासोबत खेळायला लागला. हा सामना केवळ एक औपचारिकता होती, कारण भारतीय संघ स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता. या सामन्यात जरी संघाने विजय मिळवला असला, तरी त्याचा काही फायदा मिळणार नाही.
नामिबियासोबतचा सामना एक फक्त औपचारिकता होती आणि आयसीसी स्पर्धेत खूप कमी वेळा भारतीय संघाला अशाप्रकाराचा सामना खेळण्याची वेळ आली आहे. यापूर्वी संघावर अशी स्थिती १९९२ मध्ये आली होती. त्यावेळी भारत उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला होता आणि दक्षिण अफ्रिकेसोबत त्याला केवळ औपचारिकतेसाठी एक सामना खेळावा लागला होता.
साल २०१२ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय संघ एखाद्या आयसीसी स्पर्धेत नॉकआउट फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही. भारतीय संघ २०१२ नंतर प्रत्येकवेळी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत पोहचला होता.
भारताने २०१३ साली एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१४ टी२० विश्वचषकात संघ उपविजेता ठरला आणि २०१५ एकदिवसीय विश्वचषकात संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. २०१६ मध्ये संघाने टी२० विश्वचषकाच्या अंतिम चार संघात स्थान मिळवले होते.
तसेच २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. २०१९ एकदिवसीय विश्वचषकातही संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. यावर्षी अंतिम सामना खेळाल्या गेलेल्या जागतिक कसेटी अजिंक्यपद स्पर्धेतही भारत उपविजेता संघ ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघातील ३९ वर्षीय शोएब मलिक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतो? घ्या जाणून
केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम





