भारतीय ऑलिम्पिक पथकासाठी स्पर्धेचा दहावा दिवस (सोमवार, २ ऑगस्ट) संमिश्र ठरला. स्पर्धेचा अखेरचा आठवडा सुरु होत असताना भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. भारतीय संघाच्या ऑलिम्पिकमधील दहाव्या दिवसातील कामगिरीचा आढावा व अकराव्या दिवसाच्या वेळापत्रकाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
दहावा दिवस राहिला संमिश्र
सोमवारी सकाळच्या सत्रात धावपटू द्युती चंद २०० मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यापासून वंचित राहिली. नेमबाज ऐश्वर्य तोमर व संजीव राजपूत थ्री पोझिशन प्रोन रायफल प्रकारात पात्रता फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. दिवसातील सर्वात दिलासादायक बातमी भारतीय महिला हॉकी संघाने दिली. साखळी फेरीत अव्वल राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला १-० अशा फरकाने पराभूत करून त्यांनी ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत मजल मारली.
सायंकाळच्या सत्रात, युवा थाळीफेकपटू कमलप्रित कौर हिने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावून सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला थाळीफेकपटू बनली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामील झालेला भारताचा एकमेव घोडेस्वार फौआद मिर्जा याने देखील अंतिम फेरी गाठण्याच्या कारनामा केला. मात्र, तो अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करू शकला नाही.
मंगळवारी असेल या प्रकारात संधी
मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताचे आव्हान भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.५० वाजता सुरू होईल. भारताची भालाफेकपटू अनू राणी अ गटातून पात्रता फेरीत उतरेल. त्यानंतर, ७ वाजता भारतीय पुरुष हॉकी संघ बेल्जियम विरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात खेळेल. १९८० नंतर भारताला प्रथमच उपांत्य फेरीच्या पुढे जाण्याची संधी असेल. सकाळी ८.३० वाजता भारताची महिला कुस्तीपटू सोनम मलिक ६२ किलो फ्रि-स्टाईलमध्ये भारताचे आव्हान सादर करेल. तिने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास तो सामना दुपारी २.४५ वाजता खेळला जाईल. मंगळवारी भारताचा शेवटचा स्पर्धक तजिंदरपाल तूर हा असून तो ३.४५ वाजता गोळाफेक पात्रता फेरीत सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ‘या’ शहरात बनतेय सर्वात मोठे हॉकी स्टेडियम, भूषवणार विश्वचषकाचे यजमानपद
चक दे इंडिया! पुरुष आणि महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिक: भारताच्या कमलजीत कौरनं थाळीफेकीत फायनल गाठली, पण पदक हुकलं