अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना बाकी असून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सरावाला सुरुवात केली असून भारताचे क्रिकेटपटू नेटमध्ये घाम गाळताना दिसले आहेत.
चौथ्या कसोटीआधी बीसीसीआयने ट्विटरवर भारतीय क्रिकेटपटू चौथ्या कसोटीआधी सराव करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़डिओला ‘ट्रेनिंग’ असे कॅप्शन दिले आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली बचावात्मक फलंदाजी करण्याचा सराव करत आहे. त्याच्याबरोबरच अजिंक्य रहाणे देखील नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. तसेच पुढे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री भारताचा सलामीवीर रोहित शर्माला मार्गदर्शन करत आहे. त्याचबरोबर विराट आणि रोहित सराव सत्रादरम्यान एका ठिकाणी बसून चर्चाही करत आहेत.
एवढेच नाही तर भारतीय संघाच्या खेळाडूंनी झेल घेण्याचाही कसून सराव केलेला दिसून येत आहे. दरम्यान, स्लीपमध्ये झेल घेण्याचा सराव करत असताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दोन-तीनवेळा चेंडू हातातून सटकल्यानंतरही शानदार झेल घेतलेलाही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे.
Training ✅@Paytm #INDvENG pic.twitter.com/G7GCV1EA8U
— BCCI (@BCCI) March 1, 2021
खेळाडूंना मिळाली ज्यादा विश्रांती
खरंतर चौथा कसोटी सामना सुरु होण्याआधी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना ज्यादाची विश्रांती मिळाली. कारण अहमदाबादलाच झालेला तिसरा कसोटी सामना केवळ दोन दिवसातच संपला. त्यामुळे खेळाडूंना चौथ्या कसोटीआधी अपेक्षेपेक्षा अधिक दिवसांची विश्रांती मिळाली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चौथा सामना महत्त्वाचा
भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारा चौथा कसोटी सामना हा केवळ मालिकेतील निकालाच्या दृष्टीनेच नाही तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने आधीच जागा मिळवली आहे. त्यामुळे सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी चुरस आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोण अंतिम सामन्यात प्रवेश करणार, ही उत्सुकता भारत-इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यानंतर संपेल. कारण चौथा कसोटी सामना भारताने जिंकत किंवा भारतीय संघाने हा सामना अनिर्णित राखत मालिका जिंकली तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होईल. पण जर भारताने हा सामना गमावला, तर ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात प्रवेश करता येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल
इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोवर्स मिळवणारा पहिला क्रिकेटपटू बनला विराट, आयसीसीने केले खास ट्विट
विराटचा माजी संघसहकारी झाला गजाआड, ‘या’ गुन्ह्यात झाली शिक्षा